रस्त्यावर थुंकण्यामुळे रहिवासी हैराण

रांगा संपल्यानंतर पालिकेने जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी

रांगा संपल्यानंतर पालिकेने जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी

कल्याण : वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शेकडो परप्रांतीय दररोज पालिकेच्या १० प्रभाग कार्यालयांच्या बाहेर रांगा लावून उभे असतात. टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, २७ गाव परिसरांतील प्रभाग कार्यालये नागरी वस्तीत आहेत. बहुतांशी परप्रांतीय तंबाखू, सुपारी, पान-विडी, तत्सम गुटखाजन्य पदार्थ खात असल्याने रस्त्यावर उभे राहून बाजुलाच थुंकत आहेत. हे थुंकणे आजूबाजूच्या सोसायटींमधील रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे.

सोसायटीतील अनेक सदस्य तुम्ही रस्त्यावर उभे राहा पण जागोजागी पिचकाऱ्या टाकू नका असे सांगत आहे. सोसायटी सदस्यांची पाठ फिरली की पुन्हा श्रमिक मंडळींकडून अस्वच्छता केली जात आहे, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. चाळी, झोपडय़ा भागांत राहत असलेली ही मंडळी विविध भागांतून येतात. कोणाला कोणता आजार आहे हे माहिती नसते. त्यामुळे या थुंकण्यामुळे नवीनच आजार उद्भवण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. रांगेत उभे असलेले बहुतांशी श्रमिक उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान भागांतील आहेत. शहरात राहून नवीन गृहसंकुल, बंगल्यांमधील प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) कामे विशिष्ट वर्ग करतो. डोंबिवली पश्चिमेत अशी कामे करणारे एका धर्माचे २५० श्रमिकांनी गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवली. काही इमारत कामावर मजूर, कंपन्यांमध्ये कामगार, भाजी, फळ, फेरीवाले यांचा समावेश आहे. जंतुनाशक फवारणीचे काय करणार याची माहिती घेण्यासाठी साहाय्यक  सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्याशी दोन वेळा संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

प्रभाग कार्यालये गजबजली

पालिकेच्या १० प्रभाग कार्यालयांच्या बाहेर दररोज दोन ते तीन किमीच्या रांगा लागत आहेत. या रांगा लावताना श्रमिक साथसोवळ्याचे कोणतेही नियम पाळत नाहीत. कल्याण पूर्व ड, जे, आय, पश्चिमेत क, अ, ब, डोंबिवलीत ग, फ, ह प्रभाग कार्यालयांच्या बाहेर सकाळपासून रांगा लागतात. घरी जाण्याच्या ओढीने ही मंडळी रात्रभर जागी असतात. पहाट झाली की पहिला क्रमांक तपासणीसाठी लागावा म्हणून प्रभाग कार्यालया समोर येतात. ह प्रभागांमधील रांगा उमेशनगपर्यंत पोहोचल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Residents harassed by spitting on the road zws