ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दीड लाखांची वस्ती आहे. त्यातील ४३ पाडे असून त्यांचे पूनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचे ठरले आहे. काहींना उत्तन तर काहींना ठाणे येथे जागा देण्यात येणार आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे पूनर्वसन होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे तसेच आसपासच्या शहरातून नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते. नागरिकांचे अर्ज स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. कांदळवनात अतिक्रमण झाले असल्यास कारवाई केली जाणार आहे.

कांदळवन क्षेत्रात गैररित्या अतिक्रमण झाले असल्यास तेथील अतिक्रमण तोडले जाईल. नियमांचा भंग करणाऱ्यांवर दया-माया दाखविली जाणार नाही. गोर-गरिबांनी झोपडपट्ट्या बांधल्या असतील तर त्या नागरिकांचे पूनर्वसन दुसरीकडे केले जाईल. आता राष्ट्रीय उद्यानात दीड लाखांची वस्ती आहे. त्यात ४३ पाडे असून तेथे आदिवासी राहतात. त्यांचे पूनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून होणार असून ते राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचे ठरले आहे. काहींना उत्तन तर काहींना ठाण्याला जागा देण्यात येणार आहे. नियमांचे भंग होईल असे कोणतेही काम केले जाणार नाही असे नाईक यावेळी म्हणाले.

जनसामान्यांच्या प्रयत्नांना मर्यादा असतात. नागरिकांच्या मनात क्रोध, निराशा त्याचे परिवर्तन आशेमध्ये करण्यासाठी हा जनता दरबार भरविण्यात आला. या जनता दरबारात सर्वच प्रकरणे यशस्वीरित्या सुटतील असा दावा करत नाही. परंतु पालघर जिल्ह्यातील ८० टक्के प्रकरणांचा निवाडा झाला होता असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.

या जनता दरबारात पहिला अर्ज संजू म्हेत्रे यांनी केला. ते अपंग आहेत. त्यांची मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात टपरी आहे. या टपरीला विद्युत मीटर बसविण्यासाठी टोरंट कंपनी परवानगी देत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

काही नागरिक जनता दरबारात त्यांची वैयक्तीत वाद घेऊन येत असतात. अशा लोकांना गणेश नाईक यांनी तंबी दिली. माझ्या व्यासपीठाचा चुकीचा वापर करु नका, वैयक्तिक वादा करता व्यासपीठाचा वापर करु नका, प्रत्येक घटकात चुकीची माणसे असतात असे गणेश नाईक म्हणाले.