लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : गेल्या महिन्यापासून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महावर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावर सोनारपाडा, विको नाका ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेपर्यंत सुरू केले आहे. या कामासाठी शिळफाटा रस्त्यावर रात्रीच्या वेळेत अवजड यंत्रणेने खोदकाम केले जात आहे. या कर्णकर्कश आवाजाने झोपमोड होत असल्याने एमआयसीडी परिसरातील रहिवासी, उद्योजक, व्यापारी त्रस्त आहेत.

या खोदकामामुळे रात्रभर मातीचा उधळा उडतो. तो रात्रभर परिसरातील घरांमध्ये उडून घरे, परिसर खराब करत असल्याच्या तक्रारी एमआयडीसीतील रहिवाशांकडून केल्या जात आहेत. एमआयडीसी भागात बहुतांशी रहिवासी नोकरदार, व्यावसायिक आहेत. रात्रीची शांत झोप घेऊन पुन्हा सकाळीच नोकरदार वर्गाला उठावे लागते. लोकांची रात्रीची झोपायची वेळ झाली की शिळफाटा रस्त्यावर खोदकाम सुरू होऊन कर्णकर्कश आवाज येतात.

आणखी वाचा-कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरूवारी दहा तास बंद

या आवाजाचा सर्वाधिक त्रास लहान बाळे, बिछान्याला खिळून असणारे वृध्द, ज्येष्ठ नागरिक, मनोरुग्ण यांना सर्वाधिक होत आहे. एमआयडीसीतील अनेक रहिवाशांनी शिळफाटा रस्त्यावर खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराची भेट घेऊन रात्रीच्या वेळेत कर्णकर्कश आवाज करत खोदकाम करू नका, अशी मागणी केली. ठेकेदाराने याविषयी रात्रीचे काम थांबवायचे असेल तर तुम्ही एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा, असे रहिवाशांना सांगितले.

शिळफाटा रस्त्याची तोडफोड

गेल्या तीन वर्षापूर्वी रस्तारूंदीकरण, सिमेंट काँक्रीटचा रस्ता, दुभाजक अशा नियोजनात बांधणी करण्यात आलेल्या शिळफाटा रस्त्याची मेट्रो कामासाठी पुन्हा उखळण करण्यात आल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या कामासाठी शिळफाटा रस्ता पुन्हा वाहनकोंडीत अडकू लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मी करून दाखविले’ हे लोकांना दाखविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावर हे काम सुरू केले असल्याची चर्चा आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा-महिन्यापासून शहापूर परिसरातून जीओचे नेटवर्क गायब, नागरिक त्रस्त

झाडे तोडली

शिळफाटा रस्त्याच्या दुभाजकामध्ये नारळी, शोभेची अनेक झाडे लावण्यात आली होती. ही सर्व झाडे मुळासकट उपटून टाकण्यात आली आहेत. याविषयी पर्यावरणप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठाण्यातील घोडबंदर रस्ता जसा मागील दोन ते तीन वर्षापासून वाहनकोंडीत अडकत आहेत तीच परिस्थिती आता कल्याण शिळफाटा रस्त्यावर निर्माण होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरून जेवढी झाडे बाधित होणार आहेत. त्याच्या दुप्पट झाडे प्राधिकरणाने ठेकेदाराकडून लावून घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.

तळोजा-कल्याण मेट्रो कामासाठी भूसंपादन झाले आहे. या मार्गाचे जे भूभाग मोकळे आहेत तेथे पहिले एमएमआरडीएने मेट्रोची कामे सुरू करावीत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दिखाव्याची कामे करून उगाच लोकांना त्रास होईल असे करू नये. -प्रमोद पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण.

शिळफाटा रस्त्यावर रात्रभर खोदकामाचा कर्णकर्कश आवाज येत असल्याने एमआयडीसीतील परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. ही कामे दिवसा किंवा अन्य भागात पहिले सुरू करावीत. शेवटच्या टप्प्यातील काम शिळफाटा रस्त्यावर करावे. -रमेश कुलकर्णी, रहिवासी.