डोंबिवली एमआयडीसी जवळील रिजन्सी अनंतम वसाहती मधील रहिवासी शिळफाटा रस्त्यावरील विको नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीने हैराण आहेत. विको नाक्यावरुन नवी मुंबई, ठाणेकडून आणि कल्याणकडून येणारी वाहने एकाच वेळी डोंबिवली शहरात प्रवेश करतात. त्याचवेळी डोंबिवली शहरातील वाहने या दोन्ही दिशेने जात असतात. यावेळी शिळफाटा छेद रस्त्यांवर तीन बाजुंनी विको नाक्यावर नेहमी कोंडी होते. या कोंडीचा सर्वाधिक फटका रिजन्स अनंतम वसाहतीमधून बाहेर पडणाऱ्या रहिवाशांना होत आहे, अशी तक्रार रिजन्सी अनंतम संकुलातील रहिवाशांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावर जलवाहिनी फुटली ; बारा तासापासून शेकडो लीटर पाणी फुकट

विको नाक्यावरील चौकात गर्दीच्या सकाळ, संध्याकाळच्या वेळेत कायमस्वरुपी दोन वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात ठेवावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे. रिजन्सी अनंतम वसाहतींमधील रहिवासी आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे, लावण्यवती महिला मंडळाच्या गौरी देशपांडे, हर्षदा पाठक, सुप्रिया वाडकर, स्मिता धुमाळ, सोनाली सदानशिव यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले.डोंबिवली एमआयडीसी जवळील रिजन्सी अनंतम वसाहतीमध्ये सुमारे आठ हजार कुटुंब राहतात. या वसाहतीमधील रहिवासी नोकरी, व्यवसायासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातून इच्छित स्थळी जातो. या वसाहतीमधील मुले परिसरातील शाळांमध्ये शिक्षण घेतात. रिजन्सी अनंतम संकुलाच्या डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी खासगी बस आहेत. या बसमधून रहिवासी शिळफाटा रस्ता ओलांडून विको नाक्यावरुन डोंबिवली शहरात जातात. शाळकरी मुले शाळेच्या बस, खासगी वाहने, रिक्षांनी डोंबिवलीतील शाळांमध्ये जातात. विको नाक्यावर कल्याण, शिळफाटा दिशेकडून आलेली वाहने एकाच वेळी डोंबिवलीत शिरकाव करत असतात. त्याचवेळी डोंबिवलीतून बाहेर पडणारी वाहने या दोन दिशांना जाण्याच्या प्रयत्नात असतात. याचवेळी शिळफाटा मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरूच असते. एकीकडे वाहने वळण घेत असताना मुख्य रस्त्यावरील वाहतूक सतत सुरू असल्याने वळण घेणारी वाहने मुख्य रस्त्यावर थांबून राहतात. विको नाक्यावर दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी होते. या कोंडीमुळे रिजन्सी अनंतम मधून बाहेर पडणाऱ्या बस, विद्यार्थी वाहू रिक्षा, खासगी वाहने यांना डोंबिवलीत शहरात तात्काळ शिरकाव करता येत नाही. ही वाहने रिजन्स अनंतमच्या प्रवेशद्वारावर अडकून पडतात. हा नेहमीचा त्रास असल्याने नोकरदारांना वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात पोहचता येत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यास उशीर होतो, असे रहिवासी लता अरगडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>येत्या महिन्यापासून कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांचा गारेगार प्रवास

संध्याकाळी कामावरुन परतल्यावर नोकरदार किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी विको नाक्यावरील कोंडीत अडकून पडतात. हा दररोज सकाळ, संध्याकाळचा त्रास असल्याने वाहतूक विभागाने गर्दीच्या वेळेत विको नाक्यावर कायमस्वरुपी वाहतूक पोलीस तैनात ठेवावेत. याठिकाणी होणारी कोंडी कमी करावी, अशी मागणी या वसाहतीमधील रहिवाशांनी कोळसेवाडी पोलिसांना केली आहे.विको नाक्यावर कायमस्वरुपी वातूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात असतात. काही वेळा काटई नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली की वाहतूक पोलीस त्या भागात तैनात करावे लागतात. त्याचा परिणाम विको नाक्यावर होतो. परंतु, विको नाक्यावर कोंडी होणार नाही यासाठी या चौकात वाहतूक पोलीस तैनात ठेऊन प्रवाशांना दिलासा देण्यात येईल, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.