डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून घरफोडय़ा, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने रहिवासी हैराण आहेत. उमेशनगर भागात महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळय़ातील सोन्याचा किमती ऐवज लुटण्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. विष्णुनगर पोलिसांनी रेतीबंदर, गणेशनगर खाडीकिनारा, उमेशनगर भागांतील गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
डोंबिवली पश्चिमेत उमेशनगर भागातून एक महिला रात्री दहा वाजता पायी घरी चालली होती. उमेशनगर बाजारपेठ आणि गर्दीचा परिसर आहे. या महिलेच्या हातामध्ये सामानाच्या पिशव्या होत्या. या भागात पाळत ठेवून असलेल्या दोन भुरटय़ा चोरटय़ांनी संबंधित महिलेच्या गळय़ातील सोन्याची गंठण, सोनसाखळी असल्याचे हेरले. तिचा दुचाकीवरून पाठलाग करत ती गर्दीतून बाहेर पडून रस्त्याच्या एका कोपऱ्यावरून एकटी जात असताना, दुचाकीस्वार वेगाने त्या ५२ वर्षांच्या महिलेच्या अंगावर आले. दुचाकी झपकन अंगावर आल्याने महिला जोरानेओरडली. घाबरलेली असल्याने या गडबडीत दुचाकीवरील भुरटय़ा चोरांनी महिलेच्या गळय़ातील चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.
या महिलेच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश वडणे तपास करत आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी उमेशनगर मासळी बाजारात रात्रीच्या वेळेत एका महिलेच्या गळय़ातील सोन्याचा ऐवज हिसकावून नेण्यात आला होता. गरिबाचा पाडा, कुंभारखाण पाडा भागात असे प्रकार नेहमी घडतात, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
डोंबिवली पश्चिमेत रेतीबंदर मोठागाव, कुंभारखाण पाडा, गणेशनगर भागात खाडीकिनारा आहे. या भागात सकाळ, संध्याकाळी रहिवासी फिरण्यासाठी येतात. यामध्ये अनेक महिला असतात. या संधीचा गैरफायदा भुरटे चोर घेतात, असे या भागातील जागरूक रहिवाशांनी सांगितले.