दीडशे मीटरच्या पट्टय़ात ३०० हून अधिक वाहने

डोंबिवली पूर्वेतील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील टाटा लाइनखाली असलेल्या दीडशे मीटरच्या पट्टय़ात सुमारे तीनशेहून अधिक दुचाकी, चारचाकी वाहने नियमबाह्य़ पद्धतीने उभी करण्यात येत आहेत. या बेकायदा वाहनतळामुळे आसपास वास्तव्य करणारे रहिवाशी हैराण झाले आहेत. या भागात टाटा लाइनच्या दुतर्फा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना ये-जा करण्यासाठी जागाच उरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारतीच्या आवारातून वाहने बाहेर काढताना रहिवाशांच्या नाकीनऊ येत आहेत.

महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर टाटा लाइनखालील जागेची पाहणी करून या ठिकाणी सुसज्ज वाहनतळ उभे करण्याचे आश्वासन दिले होते.

तसेच टाटा लाइन भागात नियमबाह्य़ वाहने उभी राहणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन शहरवासीयांना दिले होते. मात्र ते प्रत्यक्षात आलेले नाही.

बेकायदा वाहनतळावर कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काही दिवसांपासून या वाहनतळात दुचाकींची संख्या वाढली आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टाटा लाइनखालील वाहनतळावर सध्या कोणाचीही मालकी नाही. या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे डोंबिवली परिसरातील वाहने कायमस्वरूपी या भागात उभी केली जातात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर वाहनदुरुस्ती

काही वाहने अनेकदा १५ दिवस जागेवरून हलत नाहीत. येथे वाहन दुरुस्ती व देखभालीची छोटी गॅरेजही आहेत. त्यांची वाहने भर रस्त्यात उभी करून देखभाल सुरू असते. त्याचा अडथळा ये-जा करणाऱ्या वाहने व पादचाऱ्यांना होत असतो. दुचाकी वाहनांचा अडोसा घेऊन हे प्रकार सुरू असतात.  पोलिसांकडे तक्रारी करूनही काही उपयोग झाला नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.