वसईच्या रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रिसॉर्ट चालकांनी रिसॉर्टमध्ये मद्यप्राशन करण्यास बंदी घातली आहे. परंतु हा प्रश्न केवळ मद्यबंदीने सुटणार नाही. समुद्रातील बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासाठी संपूर्ण किनारपट्टीवर मद्यप्रशासनास बंदी आणि इतर सुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबाजणीची गरज आहे. पर्यटकांनीही स्वत:ला शिस्त लावणे गरजेचे आहे.

वसईच्या रिसॉर्ट्समध्ये ‘दारूबंदी’चा निर्णय सध्या गाजतोय. पर्यटनाच्या ऐन मोसमात रिसॉर्ट चालकांनी हा निर्णय घेतला आहे. रिसॉर्टमध्ये येणारे पर्यटक मूडमध्ये असतात आणि त्यांनाच मद्य नाकारणे तसे व्यावसायिकदृष्टय़ा धंद्याला मारकच आहे. परंतु तरणतलावात बुडून पर्यटकांचे होणारे मृत्यू तसेच छेडछाडीच्या आणि इतर अप्रिय घटना या मद्यपानामुळेच होत असल्याने त्या रोखण्यासाठी हा निर्णय रिसॉर्टचालकांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सुजाण नागरिकांकडून स्वागत होत आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाली तर रिसॉर्टची सुरक्षितता राहील पण बाहेरचे काय? कारण सर्वाधिक मृत्यू हे समुद्रात बुडून होत असतात. त्यामुळे मद्यबंदी केवळ रिसॉर्टमध्ये नको तर किनाऱ्यावरही करण्याची आवश्यकता आहे. या बंदीमुळे पर्यटकांच्या एकूणच सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. केवळ मद्यबंदी हा एकमेव उपाय नसून अनेक बाजूंनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक उपाययोजनांची गरज आहे.

वसईला निसर्गाने भरपूर वरदान दिलेलं आहे. पश्चिमेला अथांग समुद्राला गर्द हिरव्या वनराईची जोड आहे. वसईचे निळेशार आणि हिरव्यागार निसर्गाने नटलेले समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत असतात.  मुंबईतून ट्रेनने तास दीड तासाच्या अंतरावर असलेल्या वसईत पोहोचणे सोयीचे असते. एक दिवसाची सहल काढता येते. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील पर्यटक वसईला पसंती देत असतात. लोकांची ही गरज लक्षात घेऊन येथे रिसॉर्ट उभारण्यात आलेले आहेत. दररोज शेकडो पर्यटक वसईच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर आणि रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी येत असतात. स्वस्तात या रिसॉर्टमध्ये जेवण आणि पिकनिकचा आनंद घेता येत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली. गेल्या काही वर्षांत रिसॉर्टची संख्या वाढली. पूर्वी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी रिसॉर्टची संख्या होती. आता मात्र त्यांचे पेवच फुटलेले आहे. स्थानिकांनी आपल्या जागेत ही रिसॉर्ट्स उभारली आहेत. या रिसॉर्टमध्ये तरणतलाव हे आकर्षण असते. वसईच्या किनाऱ्यावर ६० हून अधिक छोटी-मोठी रिसॉर्ट्स आहेत. त्यातील केवळ दोन रिसॉट्समध्ये मद्यविक्रीचा अधिकृत परवाना आहे. परंतु सर्वच रिसॉर्ट्समध्ये बेकायदेशीर मद्यप्राशन करण्यास परवानगी होती. तरुणाचा गट हमखास रिसॉर्टमध्ये मद्यपान करतो. येताना सोबत मद्याच्या बाटल्या आणल्या जातात. अनेक रिसॉर्टमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने मद्यविक्री केली जात आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम आता या रिसॉर्ट चालकांनाच भोगावे लागत आहेत. कारण तरणतलावात बुडून अनेक पर्यटकांचे मृत्यू होऊ  लागले आहेत. सुरुवातीला जीवरक्षक नसायचे. आता जीवरक्षक असूनही हे मृत्यू थांबलेले नाहीत. मद्यप्राशन केल्यानंतर वेळ संपल्यावरही तरणतलावात उतरणे, सुरक्षारक्षकांना न जुमानता पाण्यात उतरून मस्ती करणे यामुळे असे अप्रिय प्रकार घडतात असा रिसॉर्टचालकांचा दावा आहे. तरुणांकडून मद्यप्राशन केल्यावर हुल्लडबाजी होते, छेडछाडीच्या घटना घडतात. इतर कौटुंबिक सहलीसाठी असलेल्यांना त्या ओंगळवाण्या कृत्यामुळे त्रास होत असतो. कळंब राजोडी रिसॉर्ट संघटनेचे अध्यक्ष रामदास मेहेर यांनी सांगितले की, प्रत्येक दुर्घटनेला आम्हा रिसॉर्ट चालकांना जबाबदार धरले जाते. आम्ही सुरक्षेचे नियम पाळतो. परंतु मद्यपान करणाऱ्या पर्यटकांमुळेच हे गालबोट लागते. एकदा मद्यपान केल्यावर ते कुणाला जुमानत नाहीत आणि म्हणून या दुर्घटना घडतात. त्यामुळे सर्व रिसॉर्ट चालकांना याचे गांभीर्य पटवून देऊन हा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर कुटंबासह आलेल्या पर्यटकांनाही त्रास होणार नाही आणि ते सहलीचा आनंद घेऊ  शकतील. त्याचबरोबर तरणतलावात जीवरक्षक नेमणे. योग्य विद्युत उपकरणे ठेवणे, हुल्लडबाजांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमणे आदी उपाययोजना रिसॉर्टचालकांना कराव्या लागणार आहेत.

रिसॉर्टमध्ये पिकनिकला जायचं आणि दारू नाही असे सांगत अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु सुजाण नागरिकांकडून त्याचे स्वागत झाले आहे. आता रिसॉर्टमध्ये मद्यपान करणारे नसल्याने आम्ही निवांतपणे आनंद घेऊ  शकतो असे पर्यटकांना वाटते. मद्यबंदीचा निर्णय घेतला असला तरी त्याची पूर्ण अंमलबाजावणी होत नाही हेदेखील खरे आहे. अर्थात कुठलाही नियम आला की पळवाटा असतात. काही जण पर्यटक आपल्याकडे खेचण्यासाठी छुप्या पद्धतीने मद्याला परवानगी देतात किंवा अनेक पर्यटक लपून मद्यपान करतात. ते पूर्ण बंद होण्यासाठी वेळ लागेल. परंतु प्रयत्न चांगला आहे.

बेकायदा वाळू उपसा

मुळात वसईतले समुद्रकिनारे धोकादायक झाले आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे बेकायदा वाळू उपसा. अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर तर बेसुमार वाळू उपशामुळे किनाऱ्यावर खोलगट  भाग तयार झाला आहे. त्यामुळे दुर्घटनेचे प्रमाण जास्त आहे. जे पर्यटक मद्यपान करत नाहीत त्यांचादेखील मृत्यू होतो. मुळात या किनाऱ्यांची माहिती नसते. त्यामुळे पर्यटक आत जातात. ग्रामस्थांच्या सूचनेकडे ते दुर्लक्ष करतात. जीवरक्षकांचा अभाव आहे. त्यामुळे अशा दुर्घटना थांबत नाहीत. किनाऱ्यावर केवळ ते धोकादायक आहे, पोहायला जाऊ  नका. आणि बळीतांचा आकडा लिहून लोक पाण्यात जायचे थांबणार नाही. त्यासाठी कडक उपाययोजना हवी. किनाऱ्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी हवी. पोलीस, पालिका, स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तशी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

किनाऱ्याचे जतन करण्याची जबाबदारी सर्वाचीच

छेडछाडीच्या घटना या किनाऱ्यावर होत असतात. हुल्लडबाजी नित्याचीच झाली आहे. यामुळे किनारेदेखील अस्वच्छ होतात. बाटल्यांचाच खच किनाऱ्यांवर पडलेला असतो. वसईचा निसर्ग हा सर्वासाठी आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदारी सर्वाचीच आहे. केवळ नियम आणि शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता पर्यटकांनी प्राथमिक सुरक्षेच्या नियमांचे पालन केले तर निश्चितपणे या अप्रिय घटना टळू शकतील.

समुद्रकिनाऱ्यावरील मद्यपान रोखणे आवश्यक

रिसॉर्टमधील मद्यबंदी हे निश्चितच सकारात्मक पाऊल आहे. पण त्याने हा प्रश्न सुटणार नाही. मद्यबंदीमुळे रिसॉर्टच्या तरणतलावातील मृत्यू आणि आतली हुल्लडबाजी थांबेल, पण बाहेरचे काय? सर्वाधिक मृत्यू हे समुद्रात होत असतात. ते रोखणे गरजचे आहे. २०१६ या वर्षांत वसईच्या किनाऱ्यावर आणि पर्यटनस्थळी विविध दुर्घटनांत ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी हाच आकडा कमी-अधिक प्रमाणात असतो. अर्नाळा बीच रिसॉर्टचे संचालक डॉ. नितीन थोरवे यांनी सांगितले की, पर्यटक केवळ रिसॉर्टमध्येच येत नाहीत तर समुद्रकिनारी फिरायला येतात. त्यातील अनेकांचा उद्देश केवळ मद्यपान करणे हा असतो. मुळात किनाऱ्यावर, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी आहे. तरीदेखील सर्रास हे मद्यपान होते. ते रोखायला हवे.