scorecardresearch

“समाजमाध्यमांवरील टिकेला जशास तसे उत्तर द्या”, मंत्री एकनाथ शिंदे यांचा युवासेना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचा कानमंत्रही त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

Eknath_Shinde
"समाजमाध्यमांवरील टिकेला जशास तसे उत्तर द्या", मंत्री एकनाथ शिंदे यांचा युवासेना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर टिका होत असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सभेच्या तयारीसाठी कामाला लागण्याच्या सुचना दिल्या. तसेच समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचा कानमंत्रही त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. याशिवाय, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे बुधवारी शिवसेना ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार, खासदार यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांपासून ते शाखाप्रमुख पदापर्यंतचे पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा मेळावा महत्वाचा मानला जात असून या मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे जाहीर सभा घेऊन त्यात शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवर टिका करीत आहेत. त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांवर टिका केली जात आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची येत्या १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला कशा पध्दतीने हजरी लावायची, कशी तयारी करायची यावर मंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेची जाहीर सभा असो किंवा इतर कार्यक्रम. त्यात ठाणे जिल्ह्यातील शिवसेना मोठ्या संख्येने सहभागी होते. तेच चित्र बीकेसीच्या सभेत दिसायला हवे आणि हि रेकॉर्ड ब्रेक सभा होईल याकडे लक्ष द्यावे अशी सुचनाही त्यांनी केली. सध्या समाज माध्यमांद्वारे अनेक टिका केल्या जात आहेत. त्या टिकेलाही जशास तसे उत्तर द्याला हवे. असे त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

येत्या काही दिवसात उध्दव ठाकरे हे आयोध्याला जाणार आहेत. या दौऱ्याची तारीख निश्चित नसली तरी त्याची तयारी आतापासून करण्याची सुचनाही शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केली, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Respond to criticism on social media as it is says minister eknath shinde rmt