वेळ वाढवून न दिल्याने मालकांचा निर्णय

ठाणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात निर्बंध शिथिल करताना जिल्हा प्रशासनाने उपहारगृहांना वाढीव वेळांचा दिलासा दिलेला नसून यामुळे संतापलेल्या उपाहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेने येत्या सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात घरपोच सुविधेसह उपाहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपाहारगृहांना भाजीपाल्याचा पुरवठा होऊ नये आणि ऑनलाईन सुविधेद्वारे उपाहारगृहातून नागरिकांना खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी काम बंद ठेवावे, यासाठी संघटनेने आतापासून प्रयत्न सुरु केले आहेत. उपहार संघटनेने घेतलेल्या निर्णयाचा फटका उपाहारगृहांच्या खानावळीवर अंवलंबून असलेल्या नागरिकांना बसणार असून यामुळे अनेकांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नवा आदेश काढून जिल्ह्यातील काही निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी उपाहारगृहांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नसल्यामुळे या व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यापुर्वी जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत उपाहारगृहे सुरु ठेवण्यास आणि त्यानंतर घरपोच सेवेस परवानगी होती. हे निर्बंध नव्या आदेशामध्ये जशेच्या तसे लागू करण्यात आले असून केवळ शनिवार हा एकच दिवस त्यांना वाढवून दिला आहे. या एका दिवसाने व्यवसायामध्ये फार काही फरक पडणार नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. निर्बंध शिथिल करताना उपाहारगृहांना इतर दुकाने आणि आस्थापनाप्रमाणेच वेळा वाढवून दिल्या जातील, अशी आशा उपहारगृह व्यावसायिकांना होती. परंतु नव्या आदेशात तसे काहीच झालेले नसल्यामुळे हे व्यावसायिक संतापले आहेत.  यातूनच ठाणे शहरात गुरुवारी मुक मोर्चा काढण्याचे उपहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेने जाहीर केले होते. अशा प्रकारचे मोर्चे काढून काहीच होणार नसल्याचा सूर काही व्यावसायिकांनी लावला होता. त्यामुळे संघटनेने अचानक मूक मोर्चा रद्द करण्याचा निर्णय रात्री घेतला. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  चर्चा सुरू केली. या चर्चेअंती येत्या सोमवारपासून जिल्ह्यात उपाहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या सोमवारपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात घरपोच सुविधेसह उपाहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारनंतर जिल्ह्यात एकही उपाहारगृह सुरू होणार नाही. त्यासाठी उपाहारगृहांना भाजीपाला पुरवठा करू नका, अशा सूचना संघटनेने पुरवठादारांना देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन सुविधेद्वारे उपाहारगृहातून नागरिकांना खाद्य पुरवठा करणाऱ्या झोमॅटा कंपनीलाही पत्र दिले असून त्यांनाही काम बंद ठेवण्याची विनंती केली आहे. – रत्नाकर शेट्टी, सल्लागार, ठाणे हॉटेल ओनर असोशिएशन