ठाणे : ठाणे महापालिका शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातून दिसून आले. ठाणे महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला असून गतवर्षी हे प्रमाण ८३.९४ टक्के एवढे होते. तसेच यातील चार माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून गतवर्षी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता.

यंदा ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून १३२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक १५ किसननगर, शाळा क्रमांक १६ सावरकर नगर, शाळा क्रमांक १८ ज्ञानसाधना, शाळा क्रमांक १९ सावरकर नगर यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याचबरोबर, महापालिकेच्या चार शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तर, मराठी माध्यमाचा एकूण निकाल ८०.६७ टक्के लागला आहे. रात्र शाळांचा (मराठी माध्यम) निकाल ६२.५० टक्के एवढा आहे. उर्दू माध्यमाचा निकाल ९७.७८ टक्के, इंग्रजी माध्यमाचा निकाल ९२.४७ टक्के आणि हिंदी माध्यमाचा निकाल ५९.३७ टक्के लागला आहे, अशी माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.