कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत केलेल्या रिक्षांची संख्या सुमारे ५६ हजार आहे. पण, या रिक्षा सोडून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अनेक कर्मचारी आपल्या स्वताच्या, नातेवाईकांच्या नावे रिक्षा घेऊन डोंबिवली, कल्याण शहरात रिक्षा चालवित आहेत. एकेका सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या पाच ते सहा रिक्षा एकावेळी शहरात प्रवासी वाहतूक देतात. या रिक्षाही शहरातील वाहतुकीची, प्रवासी वाहतुकीची शिस्त बिघडवत असल्याच्या तक्रारी आहेत.

सेवानिवृत्तांचा जोडधंदा

शासनाचे विविध विभाग म्हणजे पोलीस, वाहतूक विभाग, महापालिका, महसूल विभाग आणि शासनाच्या इतर विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी शासनाकडून सेवानिवृत्त वेतन घेतात. सेवानिवृत्तीनंतर जोड व्यवसाय म्हणून हे सेवानिवृत्त कर्मचारी शासनाला अंधारात ठेऊन रिक्षा परवाना काढतात. शासकीय नोकरीचा दबाव आणून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आपल्या नातेवाईक पाच ते सहा जणांना रिक्षा परवाना मिळवतात. हा परवाना मिळाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी स्वता आणि त्याचे नातेवाईक शहरात रिक्षा चालवतात. यामधील अनेक रिक्षा या सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी भाड्याने चालविण्यास देतो. या माध्यमातून रिक्षा चालकाकडून दररोज, तर काही दरमहा भाडे वसूल करतात, अशी खात्रीलायक माहिती आहे.

एकेका सेवानिवत्त कर्मचाऱ्याच्या सहा ते सात रिक्षा आहेत. या रिक्षांवर सेवानिवृत्त कर्मचारी कधी तरी रिक्षा चालवतो. उर्वरित दिवस तो ती रिक्षा भाड्याने चालविण्यास देतो. नातेवाईकांचे नाव पुढे करून परवाना घेतलेल्या रिक्षा सेवानिवृत्त भाड्याने चालविण्यास देतो.

या रिक्षा भाड्याने चालविणारे रिक्षा चालक दिवसभरात अधिक भाडे मिळेल आणि आपल्या मूळ मालकाला ठरलेली रक्कम देऊन अधिकचे भाडे पदरात कसे पडेल यासाठी प्रयत्नशील असतो. यासाठी तो निष्काळजीपणे, बेदरकारपणे रिक्षा चालवतो. अशा चालविण्याने अपघात होतात. आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी आहोत. आम्हाला कोणी काय करू शकत नाही. आमच्या रिक्षांना कोणी काही करू शकत नाही, असा या रिक्षा चालकांच्या सेवानिवृत्त मूळ मालकाचा तोरा असतो, अशा तक्रारी आहेत.

स्थानिक वाहतूक पोलिसांना अशा रिक्षा चालकांची माहिती असते. आरटीओ अधिकारी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक, शहराच्या विविध भागात कारवाईसाठी आले की रिक्षा वाहनतळ, रस्ते, चौकात उभे असलेले हे रिक्षा चालक कारवाई टाळण्यासाठी पळून जातात. या तपासणीत आपल्या जवळील कागदपत्रात काही त्रृटी आढळली. आपल्या शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव उघड झाले तर नाहक झंझट मागे नको म्हणून असे रिक्षा चालक पळून जातात.

लिंक अपयशी

सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त वेतन घेत असतो. त्याच बरोबर तो एकाचवेळी आपल्या नावाने रिक्षा नावावर घेऊन ती चालवत असतो. आपल्या नातेवाईकांच्या नावे रिक्षा घेऊन चालवत असतो. ही सर्व माहिती रिक्षा खरेदी, या रिक्षेसाठी कर्ज घेताना आधार, बँक खाते जुळणीमधून उघड होणे आवश्यक असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाला ही सर्व माहिती कळणे आवश्यक आहे.

या सर्व यंत्रणेतील त्रृटीचा गैरफायदा घेत सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्तीनंतर आपल्या नावे, आपल्या नातेवाईकांच्या नावे रिक्षा परमिट काढून ठेवतो. या माध्यमातून जोडधंदा म्हणून रिक्षा प्रवासी वाहतूक करून शहर वाहतुकीत अडथळे आणतो. शहरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रिक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याची चौकशी होण्याची गरज आहे, असे रिक्षा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

एकीकडे बेरोजगारी कमी करण्यासाठी शासन रिक्षा परवाने वाटते. पण यामधील अनेक परवाने हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी अधिक संख्येने घेतात. अशा रिक्षा चालकांची चौकशी होणे आवश्यक आहे. संतोष नवले कार्याध्यक्ष, रिक्षा चालक मालक युनियन. कल्याण शहर.