ठाणे : कडक शिस्तीचे आणि अभ्यासू प्रशासक म्हणून ओळख असलेले निवृत्त सनदी अधिकारी गो. बा. पिंगुळकर यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पिंगुळकर यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. अभ्यासू वृत्ती आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी छाप पाडली. त्यांच्या कर्तबगारीची दखल घेत त्यांना नियोजित वेळेच्या तीन वर्षे आधीच आयएएस पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी नगरविकास विभागात सचिव म्हणून काम पाहिले. तसेच मुख्य सचिवांचे सहसचिव, ठाणे जिल्हाधिकारी आदी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९९४ साली ते कोकण विभागीय अधिकारी पदावर कार्यरत असताना निवृत्त झाले. पिंगुळकर हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित होते. ठाण्यातील चटई क्षेत्र वाढविल्यास पायाभूत सुविधांवर होणारा ताण, पर्यावरणीय परिणाम आणि नियोजनातील विसंगती यांचा तपशीलवार लेखाजोखा मांडत त्यांनी चटई क्षेत्र वाढीस ठाम विरोध केला होता.