ठाणे : मुंबई महापालिकेतील निवृत्त अधिकाऱ्याची ऑनलाईन माध्यमातून एक कोटी ५३ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राबोडी भागात फसवणूक झालेले व्यक्ती राहतात. सुमारे चार महिन्यांपूर्वी ते फेसबुक खाते तपासत असताना त्यांना एक जाहिरात दिसली. या जाहिरातीमध्ये शेअर बाजारासंदर्भाची माहिती होती. त्यांनी जाहिरातीवर क्लिक करताच ते एका व्हाॅट्सॲप समूहामध्ये जोडले गेले. काही दिवसांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका महिलेने संदेश पाठविला. तसेच गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले.

गुंतवणूकीस तयारी दर्शविल्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. त्यांनी या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप सामाविष्ट झाले. या ॲपच्या माध्यमातून त्यांना २१ वेळा व्यवहार करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एक कोटी ५३ लाख ११ हजार रुपये वळते करण्यात आले. ही रक्कम पुन्हा हवी असल्यास आणखी ७५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल झाला आहे.