ठाणे : ठाण्यातील निवृत्त शिक्षकाला राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा (एनआयए) तसेच पोलीस असल्याची बतावणी करुन डिजीटल अटकेच्या नावाखाली ११ लाख रुपये ऑनलाईनरित्या फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निवृत्त शिक्षक कोलशेत भागातील एका गृहसंकुलात राहत असून ते ६९ वर्षांचे आहेत. २१ एप्रिलला ते घरात असताना एका व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सॲप क्रमांकाद्वारे संपर्क साधला. त्या व्यक्तीने ते एनआयए विभागाचे प्रमुख असल्याची ओळख सांगितली. तसेच पैशांची अफरातफर का केली अशी विचारणा त्यांनी शिक्षकाला केली. असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे शिक्षकाने सांगितले. त्यानंतर त्यांना वारंवार व्हाॅट्सॲपवर काॅल येऊ लागले. ते भामटे स्वत:ला पोलीस असल्याचे भासवित असे. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने व्हिडीओ काॅल केला. त्यामध्ये तो व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात होता.
व्हिडीओ काॅलमधील व्यक्तीने शिक्षकाला घाबरविण्यासाठी त्यांच्याविरोधात लखनौ आणि काश्मीरमध्ये आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. सध्या डिजीटल अटक करत असून काॅल बंद केल्यास थेट घरी येऊन अटक करु अशी धमकी त्यांना देण्यात आली. या प्रकारामुळे शिक्षक घाबरले. २१ ते २७ एप्रिल पर्यंत हा प्रकार सुरु होता. २७ एप्रिलला त्यांनी शिक्षकाला त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे, याबाबत विचारले. तसेच पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षकाने त्यांच्या ११ लाख रुपयांच्या ठेवी असल्याचे म्हटले. त्या भामट्यांनी तात्काळ ऑनलाईनरित्या पैसे पाठविण्यास सांगितले.
शिक्षकाने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठविले. पैसे पाठविल्यानंतर शिक्षक ठाणे सायबर पोलीस ठाण्यात सुरक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले असता, पोलिसांनी त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. याप्रकरणी त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
