वाढत्या बांधकामांमुळे दररोज निर्माण होणाऱ्या शेकडो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असताना, ठाणे महापालिकेने हा बांधकाम कचरा (डेब्रिज) पुन्हा बांधकामासाठी वापरात आणण्याचा संकल्प केला आहे. ठाणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या बांधकाम कचऱ्यावर प्रक्रिया करून बांधकाम साहित्य तयार करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटेलच, शिवाय त्यामुळे होणारे वायुप्रदूषणही कमी होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधून निघणारा बांधकाम कचरा खाडीकिनारी, महामार्गावरील रस्त्यांच्या कडेला अथवा मोकळ्या भूखंडांवर टाकण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. याशिवाय न्यायालयाच्या आदेशांनंतर ठाणे, कळवा, मुंब्रा शहरांतील बेकायदा बांधकामे तसेच धोकादायक इमारती पाडण्याची कारवाईही वेगाने सुरू आहे. या कारवाईदरम्यान मोठय़ा प्रमाणात बांधकाम कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी ठोस यंत्रणा ठाणे महापालिकेकडे नाही. त्यामुळे हा कचरा वाहून नेणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूकदारांना बांधकाम व्यावसायिकांकडून चांगला दर मिळतो. त्यामुळे नवी मुंबई तसेच ठाण्याच्या खाडीकिनारी डेब्रिज वाहून नेणाऱ्या टोळ्याच निर्माण झाल्या आहेत. या वाहतूकदारांकडून खाडीकिनारी किंवा खारफुटींच्या जागांवर बांधकाम कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोच; शिवाय वायुप्रदूषणातही भर पडते आहे.
या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने या बांधकाम कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे पुन्हा बांधकाम साहित्यात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी लोकसहभागातून असा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बांधकाम कचऱ्यामधील रेती, सिमेंट, खडी असे घटक वेगळे केले जाऊ शकतात. त्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा बांधकामासाठी वापरात आणले जाऊ शकतात, असे तंत्रज्ञान काही खासगी संस्थांनी विकसित केले असून त्याच्या यशस्वितेसंबंधी अभ्यास केला जात आहे, असे पालिका आयुक्त जयस्वाल यांनी स्पष्ट केले. ‘येत्या काळात ठाणे शहरात समूह विकासासारख्या योजना राबविल्या जाणार आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जुन्या इमारती पाडल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रक्रिया प्रकल्प उभा केला गेल्यास खाडीकिनारी किंवा रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला जाऊ शकतो,’ असा दावा संजीव जयस्वाल यांनी केला.