scorecardresearch

नंदनवन सुंदर बाग स्पर्धेद्वारे झाडांचा खजिना उघड

घराच्या गच्चीवर, अंगणात, बाल्कनीत कोणी छंद म्हणून तर कोणी घराचे सुशोभीकरण म्हणून छोटीशी बाग फुलवत असतात.

पर्यावरण दक्षता मंडळाची आगळीवेगळी स्पर्धा; स्पर्धेच्या निमित्ताने घरगुती बागांची सजावट

ठाणे : घराच्या गच्चीवर, अंगणात, बाल्कनीत कोणी छंद म्हणून तर कोणी घराचे सुशोभीकरण म्हणून छोटीशी बाग फुलवत असतात. याच बागांचे परीक्षण करून त्यांना पारितोषिक देऊन नागरिकांच्या या छंदाला प्रोत्साहन मिळावे यासाठी डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळातर्फे  नंदनवन – सुंदर बाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण-डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा आणि अंबरनाथमधील अनेक नागरिकांनी यात सहभाग नोंदवला होता. नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून आपल्या घराच्या आवारात लागवड केलेल्या विविध प्रजातींच्या झाडांचा एक प्रकारे खजिनाच या स्पर्धेतून समोर आला आहे.

पर्यावरण दक्षता मंडळातर्फे मागील सोळा वर्षांपासून ठाणे शहरात नंदनवन सुंदर बाग स्पर्धेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तर मागील तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत कल्याण-डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा राबविण्यात आली. कल्याण-डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा आणि अंबरनाथ मधील ५५ ते ६० घरगुती बागांचे आणि तसेच काही गृहसंकुलांमध्ये फुलविण्यात आलेल्या बागांचे पर्यावरण दक्षता मंडळाच्या स्वयंसेवकांमार्फत परीक्षण करण्यात आले. यामध्ये घराभोवतीची बाग, निवडुंग, किचन गार्डन, बोन्साय, टेरेस गार्डन, औषधी वनस्पती, हँिगग वनस्पती, घराच्या आतील वनस्पती, बॉक्स ग्रील, गृहसंकुलांची बाग, फुलपाखरू उद्यान, तसेच कल्पनाशक्ती वापरून नावीन्यपूर्ण गोष्टीयुक्त बाग इत्यादी प्रकारच्या बागा नागरिकांनी फुलवलेल्या असल्याचे दिसून आले. यापैकी बहुतांश नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून या पद्धतीने बाग जोपासत असल्याची माहिती दिली.

या स्पर्धेमुळे आम्ही आमची बाग नव्याने सजवली. कुंडय़ांची आकर्षक पद्धतीने मांडणी केली, तसेच काही दुर्मीळ आणि औषधी वनस्पतींचीही घराच्या आवारात नव्याने लागवड केली. दैनंदिन कामकाजातून थोडा वेळ काढत पर्यावरणाच्या जवळ जाता आले, असे मत स्पर्धकांनी व्यक्त केले. पर्यावरण दक्षता मंडळाबरोबरच इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट, वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ कल्याण आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही नुकताच पार पडला.

घराच्या आवारात एक हजार रोपांची लागवड

डोंबिवलीतून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सुवर्ण सोमनाथ रसाळ यांनी या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. सुवर्ण रसाळ यांनी त्यांच्या घराच्या आवारात सुमारे एक हजार विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे. यामंध्ये औषधी वनस्पती, रंगीबेरंगी फुलझाडे, निवडुंग , त्याचबरोबर आंबे, नारळ, चिकू, फणस, लिची, जाम, अंजिर, अ‍ॅप्पल बोर या फळ झाडांचीसुध्दा लागवड केली आहे. मागील दहा ते बारा वर्षांपासून विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करत असल्याचे सुवर्ण रसाळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reveal treasure trees paradise beautiful garden competition ysh

ताज्या बातम्या