डोंबिवली – मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दिवा, साबे पूर्व भागातील कांदळवनावरील (खारफुटी) कचरा आणि माती भरावप्रकरणी ठाणे महसूल विभागाने मागील पाच वर्षाच्या कालावधीत एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हरितक्षेत्रात बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची ३१ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत, अशी माहिती ठाणे महसूल विभागाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली आहे.
ठाणे महसूल हद्दीतील कांदळवनाचे जंगल, हरितक्षेत्र संवर्धनासाठी महसूल विभागाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. दिवा-मुंब्रा कांदळवनाचा पट्टा हा मुंब्रा मंडळ अधिकारी यांच्या अधिपत्त्याखालील मुंब्रा, दिवा, दातिवली, शीळ, देसाई या महसुली गाव हद्दीत येतो. या भागात कोठेही कांदळवनाचे जंगल नष्ट करून, हरितपट्ट्यावर माती, कचऱ्याचा भराव होत असेल आणि याविषयी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली किंवा यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यावर तातडीने त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित भराव रोखण्याचे काम करून हे बेकायदा काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो, असे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.
दिवा, मुंब्रा पट्ट्यात असे प्रकार गेल्या चार वर्षाच्या कालावधीत निदर्शनास आल्यावर भराव करणाऱ्या संबंधितांवर वरिष्ठांच्या आदेशावरून पर्यावरण कलम १९८६ चे १५, १७ अंतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. मौजे दिवा गाव हद्दीत कांदळवनाची कत्तल केल्याप्रकरणी गणेश पाटील यांच्या विरुध्द ऑगस्ट २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवा भागात कचऱ्याची विल्हेवाट लावणारा कचरा ठेकेदार मेसर्स मेट्रो वेस्ट हँडलिंग यांच्या विरुध्द फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यातील अन्य एक भूमाफियाविरुध्द कांदळवन कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय हरित लवादाचे सदस्य, महसूल अधिकारी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिवा, मुंब्रा भागातील कांदळवन क्षेत्राची पाहणी केली. यावेळच्या पाहणीत खारफुटीची झाडे तोडून भूमाफियांनी या ठिकाणी भराव करून रहिवासी, वाणिज्य अशी एकूण ३१ बेकायदा बांधकामे केली होती. ही सर्व बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने महसूल विभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली आहेत. दिवा उग्रेश्वर मंदिर गणेश घाटाजवळ कांदळवनावर भराव केल्याप्रकरणी प्रदीप पाटील यांच्या विरुध्द गु्न्हा नोंद करण्यात आला आहे. दिवा येथील एका जमीन मालकाच्या जमिनीवर कचऱ्याची विल्हेवाट लावून त्या ठिकाणच्या हरितपट्ट्याचा नाश केल्याप्रकरणी एका जमीन मालकावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
महसूल हद्दीतील कांदळवन क्षेत्र, हरितपट्ट्यावर भराव, त्यावर बेकायदा बांधकाम होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. कांदळवनावर भराव करून बांधकाम करणाऱ्यांवर पर्यावरण संवर्धन कायद्याने गु्न्हे दाखल केले जात आहेत. दिवा, साबे भराव प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. – उमेश पाटील, तहसीलदार, ठाणे.