कल्याण शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी उभारलेल्या ‘विनारिक्षा प्रवास’ आंदोलनाला उणेपुरे दहा दिवस लोटतात न तोच शहरातील रिक्षावाल्यांची ‘लॉबी’ किती शक्तीशाली आहे, याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. शहरातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या पूर्वेकडील परिसरात नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर सुरू करण्यात आलेली परिवहन सेवेची बससेवा चक्क रिक्षाचालकांच्या ‘विनंती’वरून बंद करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला. त्यामुळे प्रवाशांचे हाल पुन्हा सुरू झाले असून रिक्षाचालकांची मुजोरी अधिक वाढली आहे.
कल्याण पूर्व परिसरात सुमारे चार लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. मुजोर रिक्षाचालकांमुळे अक्षरश हैराण झालेल्या येथील प्रवाशांना केडीएमटीची १०१ आणि १०२ क्रमांकाची बस म्हणजे मोठा आधार होती. मात्र, ‘आमच्या व्यवसायावर परिणाम होतो’ अशी तक्रार करत रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांची भेट घेऊन ही सेवा बंद करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर या भागातील खराब रस्ते आणि प्रवाशांची कमी संख्या अशी कारणे पुढे करत परिवहन व्यवस्थापनाने ही बससेवाच बंद केली. त्यामुळे कल्याण पूर्व परिसरामध्ये सुमारे १५ वर्षांनंतर सुरू झालेल्या बससेवेला अवघ्या काही महिन्यातच पूर्णविराम मिळाला आहे.
अरुंद आणि खराब रस्ते, उंच सखल भाग अशी विविध कारणे देत गेली १५ वर्षांपासून कल्याण पूर्वेत परिवहनची बससेवा सुरू होत नव्हती. त्यामुळे या भागात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली होती. याला विरोध करून परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी परिवहन बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालवले होते. केंद्रातून ‘जेएनएनएमयू’ अंतर्गत निधी उपलब्ध झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेला १९ मिडी बसगाडय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या. या बसगाडय़ांच्या माध्यमातून पूर्वेकडील भागात बससेवा सुरू झाली. कल्याण पूर्वेतील गणेशमंदिर ते चिंचपाडा गाव आणि कतल्याण स्टेशन, सिध्दार्थनगर ते तिसगावमंदिर अशा दोन बस गाडय़ा सुरू करण्यात आल्या होत्या. २० मिनिटांनी एक फेरी अशा दिवसाला प्रत्येकी ३० फेऱ्या सुरू करण्यात आल्याने प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न मिटला होता.
मात्र, या प्रकारामुळे रिक्षा व्यवसायापुढे स्पर्धा निर्माण झाल्यामुळे रिक्षा युनियनच्या वतीने या बस फे ऱ्या बंद करण्यासंबंधी दबावतंत्र सुरू झाले. प्रवाशांनी भरलेली बस अडवणे, टायर पंक्चर करणे असे प्रकार सुरू झाले. त्यामुळे या बससेवेला काही भागात प्रवाशांचा ओघ आटला. बसचे उत्पन्न प्रत्येक फेरीला ८०० ते १००० रुपयांपेक्षा अधिक असणे आवश्यक होते. मात्र, तसे होत नव्हते. नेमका हाच मुद्दा उचलत परिवहन विभागाने ही बससेवाच बंद करून टाकली.
कल्याण पूर्वेत बससेवा पुन्हा सुरू करणार..
भागातील रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही सेवा देत असताना आणखी बस सेवा या भागात नको’ अशी विनंती केली होती. शिवाय बस कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न या भागातील रिक्षाचालकांकडून केला जात होता. या मार्गावरून मिळणारे उत्पन्नही कमालीची कमी होते. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवली परिवहन महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली. मात्र पुढील काही दिवसांमध्ये या भागात पुन्हा बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2015 रोजी प्रकाशित
‘रिक्षा’च्या दबावापुढे ‘बस’ झुकली!
कल्याण शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी उभारलेल्या ‘विनारिक्षा प्रवास’ आंदोलनाला उणेपुरे दहा दिवस लोटतात न तोच शहरातील रिक्षावाल्यांची ‘लॉबी’ किती शक्तीशाली आहे, याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे.

First published on: 11-03-2015 at 08:51 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw bus conflict