ठाणे : बाळकूम-साकेत मार्गावर चालकाने रिक्षा चालविताना मोबाईल वापरल्याने झालेल्या अपघातात तीन अल्पवयीन मुले जखमी झाले. यातील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिघांवरही उपचार सुरु असून याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार हे कळवा येथे राहत असून त्यांचे बाळकूम भागात चायनीज खाद्य पदार्थ विक्रीची हातगाडी आहे. या पदार्थांच्या विक्रीतून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होतो. दिवाळीत शाळेला सुट्टी असल्याने गुरुवारी तक्रारदार यांचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र तक्रारदार यांना मदत करण्यासाठी आले होते. गुरुवारी मध्यरात्री तक्रारदार यांनी तिघांनाही त्यांच्या एका ओळखीच्या रिक्षाचालकाला बोलावून त्यांना घरी सोडण्यास सांगितले.
रिक्षा चालक बाळकूम साकेत मार्गावर आला असता, तो एका हाताने त्याचा मोबाईल वापरत होता. येथील पोलीस मैदान परिसरात रिक्षा आल्यानंतर चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. त्यामुळे दोन मुले रिक्षा बाहेर फेकली गेली. यातील दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर रिक्षा चालक तेथून पळून गेला. तिघांनाही उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर मार लागलेल्यापैकी एका मुलाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात करावे लागले. या अपघाताप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
