भंगार, बनावट क्रमांकाच्या रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर कारवाईची मोहीम
डोंबिवलीत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून भंगार, बनावट क्रमांकाच्या रिक्षा वापरून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. सोमवार सकाळपासून सुरू झालेली ही मोहीम मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. गेल्या दोन दिवसांत परिवहन अधिकाऱ्यांनी २० ते २५ मुदत संपलेल्या भंगार रिक्षा जप्त केल्या आहेत. या रिक्षा चालकांना रिक्षा चालविण्याची मुदत संपलेल्या दिवसापासून दंड आकारण्यात येत आहे. प्रत्येक रिक्षा चालकाला सुमारे सव्वा ते दीड लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येत आहे.
कारवाईची मोहीम सुरू झाल्यानंतर बेकायदा रिक्षा व्यवसाय करणारे रिक्षा चालक रेल्वे स्थानक परिसर, रिक्षा वाहनतळावरून गायब होते. या कारवाईबद्दल प्रामाणिक रिक्षा चालक समाधान व्यक्त करीत होते. डोंबिवली पश्चिमेतील स्वच्छतागृह व विष्णुनगर रेल्वे प्रवेशद्वारावर थोडे दिवस पाळी पद्धतीने उभे राहून वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांचा काही दिवस बंदोबस्त केला. वाहतूक पोलीस या ठिकाणावर संध्याकाळी चार वाजल्यानंतर येत असल्याने तोपर्यंत हे रिक्षा चालक नेहमीप्रमाणे रस्ते अडवून उभे राहू लागले आहेत. त्यांच्यावरही आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उभारण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. पण मंगळवारी सकाळीच आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक, सूर्यकांत गंभीर, प्रशांत शिंदे डोंबिवलीत अवतरले. अचानक रिक्षा तपासणी मोहीम सुरू केली.
त्यामुळे सकाळीच प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर आलेल्या रिक्षा चालकांची गाळण उडाली. रेल्वे स्थानक परिसरात आरटीओ अधिकारी असल्याने काही रिक्षा चालकांनी प्रवाशांना डोंबिवली पश्चिमेत गोमांतक बेकरीजवळ सोडून तेथून पाठीमागे पळ काढणे पसंत केले.
आरटीओ अधिकाऱ्यांनी किमान आठवडय़ातून एक दिवस कल्याण डोंबिवलीतील रिक्षांची तपासणी करून त्यांना मोटार वाहन कायद्याप्रमाणे जबर दंड ठोठावला तर रेल्वे स्थानक परिसर, गल्लीबोळात रिक्षा चालकांनी जी वाहतूक कोंडी करून ठेवली आहे त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पादचाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

दोन दिवसांत २० ते २५ लाखांचा दंड
दोन दिवसांच्या कारवाईत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सुमारे २० ते २५ मुदत संपलेल्या भंगार रिक्षा जप्त केल्या आहेत. १५० भंगार रिक्षा चालकांची यादी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. भंगार रिक्षा आरटीओ अधिकाऱ्यांना सापडली तर रिक्षा चालकावर रिक्षा चालविण्याची मुदत संपल्यापासून दरमहा १०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येतो. वर्षांला ३६ हजार रुपयांचा दंड तयार होतो. काही रिक्षा चालक तीन ते चार वर्षांपासून भंगार रिक्षा वापरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याप्रमाणे त्या रिक्षा चालकांना १ लाख २५ हजार ते १ लाख ४० हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येत आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.