कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील काही उद्दाम रिक्षा चालक रेल्वे अधिकारी, पोलिसांना न घाबरता थेट आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरुन प्रवासी वाहतूक करत असल्याने प्रवासी हैराण आहेत. प्लॅटफॉर्मवरुन रिक्षा घेऊन जाऊ नको असे सांगुनही अनेक रिक्षा चालक ऐकत नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले. अशाच प्रकारचा आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरुन एक रिक्षा चालक प्रवासी घेऊन जात असल्याची दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

या दृश्यचित्रफिती मधील रिक्षा चालक एक प्रवासी रिक्षा प्लॅटफॉर्मवरुन घेऊन जाऊ नये म्हणून विरोध करत असताना त्याला न जुमानता प्लॅटफॉर्मवरुन रिक्षा घेऊन जात असल्याचे दिसत आहे. रिक्षा चालकाच्या या उद्दामगिरीबद्दल प्रवाशांना आश्चर्य व्यक्त केले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आंबिवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रकरण तपासून प्लॅटफॉर्मवरुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांचा शोध सुरू केला आहे. मंगळवारी संध्याकाळी एक रिक्षा चालक आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरुन रिक्षेला वळसा मारुन प्रवासी वाहतूक करत असल्याची एक दृश्यचित्रफित प्रसारित झाली आहे.

हेही वाचा : यवतमाळ : सुरक्षा रक्षकाने मारली दांडी अन् चोरट्यांनी साधली संधी ; सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लाखोंचा फटका

ही दृश्यचित्रफित रेल्वेच्या वरिष्ठांनी पाहिली असून त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. अचानक रिक्षा चालकाला रिक्षेवरील ताबा सुटून रिक्षा रेल्वे मार्गात पडली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. असे असताना आंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील बहुतांशी रिक्षा चालक प्रवाशांशी उद्दामपणे वागणे, भाडे नाकारणे, वाढीव भाडे आकारणे असे प्रकार करत आहेत. काही रिक्षा चालक उद्दामपणा करत थेट फलाटावर रिक्षा आणून वळसा घेऊन प्रवासी वाहतूक करत आहेत. प्लॅटफॉर्मवर रिक्षा आणणाऱ्या दृश्यचित्रफितीची सध्या सर्वदूर चर्चा सुरू आहे.

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, आंबिवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधीलचित्रीकरण तपासून संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेतला जाईल. त्याच्या वाहन क्रमांकावरुन रिक्षा चालकावर कायदेशीर कारवाई रेल्वेकडून केली जाईल. याशिवाय ही माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात येऊन संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. रिक्षा संघटनेच्या कल्याण मधील एका पदाधिकाऱ्याने अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कठोर झालीच पाहिजे. इतर रिक्षा चालकांना तो मोठा धडा असेल.