ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील काही मतदार संघांची यादी सादर केली असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच मतदार संघांचा समावेश आहे. त्यात ठाणे शहर आणि अंबरनाथ या दोन जागांवर दावा करण्यात आला आहे. या दोन जागांसाठी उबाठा आग्रही असताना काँग्रेसने त्या जागांची मागणी केल्याची माहिती राजकीय सुत्रांनी दिली. यामुळे ठाणे जिल्ह्यात या दोन जागांवरून महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची चिन्हे आहेत.

येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठींसोबतच बैठका सुरू आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुक रणनिती, जागावाटप या मुद्द्यांवर चर्चा सुरू असून या चर्चेदरम्यान, राज्यातील ज्या जागांवर काँग्रेस निवडणुक लढण्यासाठी इच्छूक आहे, त्या जागांची यादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत सादर केली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, मिरा-भाईंदर, भिवंडी पश्चिम, अंबरनाथ आणि मुरबाड या पाच जागांचा समावेश आहे. यातील मुरबाड मतदार संघावर काँग्रेसने दावा केला असला तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाही या जागेसाठी आग्रही आहे. तर, ठाणे शहर आणि अंबरनाथ या जागेंसाठी उबाठा गट आग्रही आहे. त्यामुळे अंतिम जागा वाटपात या जागा कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच यानिमित्ताने जिल्ह्यातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत जागा वाटपांचा तिढा वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा…कल्याण डोंबिवली पालिकेतील खंडणीखोर कर्मचाऱ्याची लवकरच विभागीय चौकशी, खंडणी विरोधी पथक पालिकेत

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेऊन त्यातून निवडणुक लढविण्यासाठी पाच मतदार संघाची निवड केली होती. यामध्ये ठाणे शहर, मिरा-भाईंदर, भिवंडी पश्चिम, अंबरनाथ आणि मुरबाड या पाच जागांचा समावेश होता. या मतदार संघांमधील पक्षाची तसेच महाविकास आघाडीची ताकद आणि उमेदवार यांचीही पक्षाने चाचपणी केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत या जागांवर दावा करत निवडणुक लढविण्यासाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणुक होत असून यामुळे दोन्ही शिवसेना उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. अंबरनाथ मतदार संघातून शिवसेना उमेदवार निवडणुक लढवित आला आहे. शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडीसोबत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जागेसाठी आग्रही आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघांमधून उबाठाचे माजी खासदार राजन विचारे हे आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. परंतु युती तुटल्यानंतर या जागेवर शिवसेनेने निवडणुक लढविली होती. शिवसेनेतील फुटीनंतर या जागेसाठी उबाठा पक्ष आग्रही असताना या जागेवर काँग्रेसनेही दावा केला आहे. यापूर्वी या मतदार संघात काँग्रेस उमेदवाराने चांगली लढत दिली होती. त्याच आधारे काँग्रेसने या मतदार संघावर दावा केल्याचे राजकीय सुत्रांकडून समजते.

हेही वाचा…डोंबिवलीजवळ हेदुटणे, उत्तरशिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमिनी देण्यास मनसेचा विरोध

कोट आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश नेत्यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाणे जिल्ह्यातील पाच जागांची मागणी केली आहे. या जागांबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सर्वच जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करीत आहोत. – विक्रांत चव्हाण, ठाणे जिल्हाअध्यक्ष, काँग्रेस