scorecardresearch

जिल्ह्य़ात हेपेटायटिसचा धोका

ठाणे जिल्ह्यात हेपेटायटिस (कावीळ) नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या ११ हजार ५८२ जणांच्या रक्ताच्या चाचणींपैकी ११६ जणांना हेपेटायटिस ब आणि क या गंभीर प्रकारच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

corona-patient
प्रातिनिधीक छायाचित्र

सर्वाधिक बाधा कारागृहातील कैद्यांना

ठाणे : ठाणे जिल्ह्यात हेपेटायटिस (कावीळ) नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या ११ हजार ५८२ जणांच्या रक्ताच्या चाचणींपैकी ११६ जणांना हेपेटायटिस ब आणि क या गंभीर प्रकारच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील सर्वाधिक बाधित हे ठाणे कारागृहातील कैदी आहेत. हेपेटायटिस अ, ब, क,ड आणि ई हे प्रकार आहेत. यातील अ आणि ई हे प्रकार दूषित पाणी प्यायल्याने किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यामध्ये रुग्णास थकवा, ताप येतो. डोळे, नख हे पिवळसर पडतात. काही दिवसांत या प्रकारातील रुग्ण आपोआप बरा होतो. परंतु हेपेटायटिस ब, क आणि ड या प्रकरचे विषाणू रक्तामार्फत शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे बाधित रुग्णास कालांतराने यकृतास सूज येत असते. रुग्णास कर्करोगाचीही धोका अधिक असतो. तसेच रुग्ण दगावण्याही शक्यता असते. देशात ब आणि क विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण हे वाढत आहे.

देशात हेपेटायटिस विषाणू नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाचे डॉ. नेताजी मुळीक यांनी ठाणे जिल्ह्यात तपासणी सुरु केली आहे. त्यामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ब आणि क विषाणूच्या तपासणीसाठी एचआयव्ही बाधित असलेले ८३३रुग्ण, शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळांमधील ३२४ , ठाणे कारागृहातील ३ हजार ६६६ कैदी, रक्तदान शिबिरातील ५ हजार ९५० नागरिक व उर्वरित आजार असलेले ८०९ अशा एकूण ११ हजार ५८२ नागरिकांचे जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ब विषाणूमुळे ७१ तर क विषाणूमुळे ४५ अशा एकूण ११६ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णांना मार्गदर्शन करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा हा हेपेटायटिसच्या चाचणीमध्ये राज्यात सर्वाधिक पुढे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार ५८२ जणांची चाचणी झाली असून राज्यात पहिल्या पाचमध्ये ठाणे जिल्ह्याच्या क्रमांक लागतो.

सर्वाधिक रुग्ण कैदी

११६ बाधितांपैकी सर्वाधिक कैदी आढळून आले आहेत. ब या विषाणूमुळे ५३ तर क या विषाणूचे ३५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आता कैद्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

ब आणि क धोका आणि लक्षणे

हेपेटायटिस ब आणि क हे रक्तातून शरिरात शिरतात. काही वर्ष हा आजार राहतो. त्यानंतर रुग्णाचे यकृत खराब होते. रुग्णांना सिरोसिस होतो. त्यानंतर त्यांना कर्करोग उद्भविण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा रुग्ण दगावू शकतो. दूषित रक्त चढविल्याने, असुरक्षित लैंगिक संबंध, मातेला कावीळ झाले असेल तर प्रसूतीवेळी मुलाला ब आणि क विषाणूची बाधा होऊ शकते. अति मद्य सेवनामुळेही हा विषाणू प्रवेश करू शकतो. रक्तचाचणी करून कोणत्या प्रकारचा हेपेटायटिस आहे हे कळू शकते. त्याची उपचार पद्धत अत्यंत खर्चीक आहे. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यावर मोफत उपचार केले जात आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Risk hepatitis district prison inmates most affected ysh

ताज्या बातम्या