Riteish Deshmukh and Genelia at Shivaji Maharaj Temple Bhiwandi: छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले सर्वांनाच परिचित आहेत. मात्र आता महाराजांचे भव्य मंदिरही महाराष्ट्रात उभे राहिले असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या या मंदिराला अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी नुकतेच भेट देत दर्शन घेतले. त्यांच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या १ मे २०२६ रोजी होणाऱ्या प्रदर्शना आधीच या मंदिराची विशेष चर्चा रंगली आहे. हे मंदिर नेमके आहे तरी कुठे, कुणी आणि कधी बांधले, याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदीर उभारण्यात आले आहे. या सर्व मंदिराची रूपरेखा ह.भ.प डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अभियंता आणि वास्तुविशारद विजयकुमार पाटील भिवंडी यांनी केली आहे. मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने व काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील हे पहिलेच भव्य मंदीर असावे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे.
या मंदिरात शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सुमारे ४ एकर जागेत हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. या मंदिराची भव्य रचना, किल्ल्यासारखी तटबंदी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आणि स्वराज्य स्थापनेतील शिवकालीन इतिहास दर्शविणारे शिल्पफलक येथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विविध शाळांच्या शैक्षणिक सहली येथे येत आहेत.
असे आहे मंदिर
गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिराच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट आहे. तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे, हे मंदीर चार एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. हे मंदीर हुबेहुब गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज, महाद्वार आहे. तसेच मंदिर प्रवेशद्वार उंची ४२ फूट असून एकूण पाच कळस, गाभाऱ्यावर ४२ फूट सभा मंडप, सभा भोवती चार कोपऱ्यावर गोलाकार बुरुज, टेहळणी मार्ग हे सर्व प्रत्यक्ष दगडाच्या तोडी घडवून उभारणी करण्यात आली आहे. तटबंदीच्या आत ३६ विभाग असून त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून इतिहास दर्शन घडविण्यात येत आहे. सर्व खांब कोरीव, महिरपी कमानी आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साडे सहा फूट असून ती अयोध्यातील रामाची मूर्ती घडविणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे.
कसे जाऊ शकता?
हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे आहे. भिवंडी आणि वसिंद ही जवळची रेल्वे स्थानके असून अनुक्रमे १७ आणि २५ किमी अंतरावरून येथे पोहोचता येते. स्थानिक वाहनं किंवा खासगी गाड्यांद्वारे मंदिरात सहज जाता येते.
