Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Promotion Bhiwandi: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील शिवक्षेत्रात एक विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक व प्रमुख अभिनेता रितेश देशमुख हे २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवक्षेत्र, मराडेपाडा (ता. भिवंडी) येथील शक्तिपीठावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रीवार मुजरा करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते महाराजांची आरतीही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे चित्रपटाच्या प्रचाराला वेग मिळण्याबरोबरच शिवभक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चित्रपटाचा भव्य पट
राजा शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट रितेश देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जात असून, त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.
या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. तसेच विशेष भूमिकेत सलमान खान झळकणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये तयार करण्यात आला असून, तेलुगूमध्ये डब आवृत्तीसह १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर साकारलेले स्वप्न
छत्रपती शिवाजी महाराजांवरील भव्य चित्रपटाची संकल्पना २०१५ पासून चर्चेत होती. विविध टप्प्यांवर प्रकल्पात बदल होत गेले, तर कोविड-१९मुळेही निर्मितीत विलंब झाला. अखेर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अधिकृत घोषणा करण्यात आली आणि चित्रपटाला ‘राजा शिवाजी’ हे शीर्षक देण्यात आले. फेब्रुवारी २०२५ पासून चित्रीकरणाला सुरुवात झाली. मुंबई, सातारा, वाई, महाबळेश्वर आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भव्य सेट्स उभारून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. सुमारे १०० दिवसांच्या चित्रीकरणानंतर डिसेंबर २०२५ मध्ये शूटिंग पूर्ण झाले.
