गणेशोत्सवात रस्ते प्रवास निर्विघ्न?

शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्यात खड्डय़ांचे प्रमाण वाढले होते.

(संग्रहित छायाचित्र)

१० सप्टेंबपर्यंत वसई-विरारच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्याचा पालिकेचा निर्णय

गणेशोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली असून शनिवारपासून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दहा दिवसांत खड्डे बुजवून गणेशभक्तांना दिलासा देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र महापालिकेच्या अखत्यारीत न येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे कोण बुजवणार असा प्रश्न कायम आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्यात खड्डय़ांचे प्रमाण वाढले होते. गणेशोत्सवाचा सण जवळ आल्याने खड्डय़ातून गणेशमर्ती आणायच्या कशा, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला होता. पालिकेने नुकतीच समन्वय समिती स्थापन केली असून गणेशभक्तांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी खड्डेमुक्त रस्ते देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पालिकेने विशेष मोहीम राबवून शहारतील सर्व रस्ते बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून सर्व ९ प्रभागांत एकाच वेळी खड्डे बुजवले जाणार आहेत. येत्या १० सप्टेंबपर्यंत खड्डे बुजवले जाणार असल्याची माहिती पालिकेतील कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने या वर्षी ४० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

वसई-विरार शहरातील महापालिकेच्या रस्त्यांवर केवळ २५० खड्डे असल्याची माहिती महापालिकेने दिली होती. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने प्रथमच आरएमसीचा (रेडी मिक्स्ड काँक्रिट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पाऊस असतानाही खड्डे बुजवण्यास मदत होत आहे.

महापालिकेने शहरात २५० खड्डे असल्याचा दावा केला आहे. पण सर्वाधिक खड्डे महापालिकेच्या अखत्यारीत न येणाऱ्या रस्त्यांवर आहेत. शहरातून चार प्रमुख मोठे रस्ते जातात, ते राज्य महामार्गाचे आहेत. ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतात. वालीव नाक्यापासून वसई तहसीलदार कार्यालय, नालासोपारा ते निर्मळ, विरार फाटा ते अर्नाळा आणि सातिवली फाटा ते गोखिवरे रेंज ऑफिस आदी चार रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतात आणि त्या रस्त्यावर

खड्डे असल्याचे महापालिकेने सांगितले. पालिका त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवेल मात्र इतर मार्गावरील खड्डे कोण बुजवणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

‘आरएमसी’चा वापर

पालिकेने यंदा प्रथमच आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील सिमेंट हे घट्ट असते आणि ते लगेच सुकते. त्यामुळे पाऊस आला तरी बुजवलेल्या खड्डय़ांवर काहीच परिणाम होत नाही. शहरात काही ठिकाणी आरएमसीचा वापर झाला आहे. पूर्वी खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जायचे किंवा तात्पुरते खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि ग्रीटचे मिश्रण वापरले जात होते. परंतु डांबरीकरण करण्यासाठी डांबर सुकण्यासाठी किमान ६ ते ८ तासांचा कालावधी लागतो. त्यासाठी पावसाची उघडीप लागते. परंतु मोठा पाऊस आला की ते काम वाया जायचे. त्यामुळे या नव्या तंत्राचा वापर करून खड्डे बुजवले जाणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Road to the ganesh festival is smooth