कल्याण : कल्याण पूर्वेतील माणेरे गावात दोन वर्षांपासून अतिक्रमणांमुळे एका वर्दळीच्या रस्त्याचे काम रखडले होते. या वर्दळीच्या रस्त्यांमधील अतिक्रमणे माणेरे गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी जमीनदोस्त केली. यामुळे दोन वर्षापासून रखडलेल्या या रस्त्यावरील रूंदीकरण आणि गटाराची कामे तातडीने सुरू करण्यात आली.

गावातील गटाराची हद्द, रस्त्यांमधील अतिक्रमणे या विषयावरून काही ग्रामस्थ गावातील रस्ता रुंदीकरणाला विरोध करत होती. एक महत्वाचा रस्ता अतिक्रमणांमुळे पूर्ण होत नसल्याने माणेरे गावातील काही ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत होते. आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांना नोटिसा देऊन रस्त्यामधील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले. दोन दिवसापूर्वी माणेरे गावात अचानक जेसीबीसह पालिकेचे तोडकाम पथक दाखल झाले. रस्ते मार्गात अडसर ठरणारी सर्व बेकायदा अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली.

या अतिक्रमणांमुळे या भागात गटाराची व्यवस्था पालिकेला करता येत नव्हती. दरवर्षी पावसाळ्यात माणेरे गावातील कृष्णानगरी चाळ भागात पावसाचे पाणी शिरत होते. आयु्क्तांनी कोणत्याही नागरी वस्तीत पावसाचे पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे साहाय्यक आयुक्त पवार यांनी पोलीस बंदोबस्तात माणेरे गावातील रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारे ११ गाळे, दुकाने, घरांसमोरील निवारे, ओटे तोडण्याची कारवाई केली. सुरूवातीला ग्रामस्थांनी कारवाईला कडाडून विरोध केला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तणावाकडे लक्ष न देताच साहाय्यक आयुक्त पवार यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने आपली कारवाई उरकून घेतली. याठिकाणी भूमिगत असलेले जुने गटार शोधून ते मुख्य नाल्याशी जोडून पावसाचे पाणी रस्त्यावर न तुंबता वाहून जाईल अशी व्यवस्था करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यामधील अतिक्रमणे हटविल्यानंतर साहाय्यक आयुक्त पवार यांनी विलंब न लावता तात्काळ ठेकेदाराला रस्ता रुंदीकरण आणि गटाराची कामे करण्यास पाचारण केले. रस्ता मोकळा केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून घाईघाईने गटार बांधण्याची कामे सुरू करण्यात आली, असे साहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले.