ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कानउघाडणी आणि ठाणे महापालिकेतील चार अभियंत्यांचे निलंबन यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्ह्य़ातील शासकीय यंत्रणांनी रविवारी दिवसभर रस्तेदुरुस्तीचा धडाका लावल्या होता.

कोंडीसाठी कारणीभूत ठरलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडी पुलावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले. या कामामुळे रविवारी दुपारी ठाणे, घोडबंदर आणि मुंब्रा शीळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतर हे काम पूर्ण होताच या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.  घोडबंदर, ठाणे शहर, कल्याण-शीळ रस्ता, काटई-बदलापूर रस्त्यावरही दिवसभर खड्डे बुजविण्याची कामे सुरू होती. रात्रीही खड्डे बुजविण्याची कामे सुरू होती.

मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंब्रा खाडीपुलावर मोठे खड्डे पडले होते. या पुलाच्या पुढील रस्त्यावरही दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. या खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावून मोठी वाहतूक कोंडी होत होती.  पालकमंत्री  शिंदे यांनी या रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची कामे हाती घेण्याचे आदेश दिले होते. या दौऱ्यात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. यानंतर खडबडून जाग आलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडी पुलावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम शनिवार रात्रीपासून हाती घेतले. 

शहरांमध्ये दिवसा अवजड वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय जिल्ह्य़ाचे पालकमंत्री शिंदे यांनी शनिवारी बैठकीत घेतला होता. असे असले तरी शनिवारी रात्री मुंब्रा खाडीपुलावर रस्ता नूतनीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यातच पहाटे शहरात शिरलेली अवजड वाहने रोखून धरणे शक्य नसल्यामुळे वाहतूक सुरू होती. यामुळे कोंडीत आणखी भर पडली. ही वाहने रोखून धरली असती तर शहरांमध्ये आणखी कोंडी झाली असती, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

ठेकेदाराला नोटीस

ठाणे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी पालिका प्रशासनाने चार अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले. त्यापाठोपाठ रस्तेदुरुस्तीची कामे करणाऱ्या बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स  या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. रस्तेदुरुस्तीची कामे तात्काळ आणि गुणवत्तापूर्ण केली नाहीत तर गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

अभियंत्यांचा बळी.! ठाणे शहरातील खड्डय़ांना जबाबदार धरत चार कार्यकारी अभियंत्यांना बळीचा बकरा करण्यात आला. मात्र, ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्यात आलेले नाही. त्यांच्यावर मेहेरनजर का? नगर अभियंता आणि ठेकेदाराला कारवाईतून का वगळले गेले? असा प्रश्न भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला. महापालिकेने खड्डे भरण्यासाठी केवळ सव्वा दोन कोटींची तरतूद केली. परंतु, खड्डे कधी भरले गेले, याचा नागरिकांनाच नव्हे तर नगरसेवकांनाही पत्ता लागला नाही. रस्त्याशी काहीही संबंध नसलेल्या एको अभियंत्यालाही निलंबित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.