महापालिकेच्या धडक कारवाईचा परिणाम; व्यापक कारवाईसाठी लवकरच आराखडा

ठाणे : महापालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने मंगळवारपासून शहरातील फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली. या कारवाईनंतर ठाणे स्थानक परिसरासह शहराच्या इतर भागातील फेरीवाल्यांनी आता पदपथ आणि रस्त्यांवर आपला बस्तान गुंडाळले आहे. यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ पुन्हा फेरीवालेमुक्त झाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथ अडवून फेरीवाले आपले बस्तान मांडतात. फेरीवाल्यांच्या या उपद्रवामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. याशिवाय रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. अशा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने ठाणेकरांकडून होत असते. परंतु त्यांच्यावर महापालिकेकडून फारशी प्रभावीपणे कारवाई होताना दिसून येत नव्हती. यामुळे शहरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढू लागली आहे. अमरजीत यादव या फेरीवाल्याने सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने केलेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर ही बाब आता स्पष्ट झाली आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारपासून शहरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये ठाणे स्थानक, सॅटिस परिसर, जांभळी नाका, नौपाडा, गावदेवी मंदिर परिसर, कळवा स्थानक पूर्व, कळवा भाजीबाजार, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट आणि पारसिक ९० फूट रस्ता परिसर या ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले.

या कारवाईनंतर फेरीवाल्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आता पदपथ आणि रस्त्यांवरील बस्तान हटविल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानक परिसराला सकाळ, सायंकाळ आणि रात्रीच्या वेळेस फेरीवाल्यांचा विळखा असतो. पण बुधवारी मात्र हा संपूर्ण परिसर फेरीवालामुक्त दिसून येत होता. कळवा, वागळे, घोडबंदर, वर्तकनगर या भागांमध्येही असेच चित्र होते.

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई आणखी व्यापक करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. शहरातील प्रभागांमध्ये कोणत्या भागात फेरीवाले ठाण मांडतात, याची माहिती गोळा करण्यात येत असून त्याआधारे त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येणार आहे. या आराखडय़ाला आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची मान्यता मिळाल्यानंतर येत्या दोन दिवसात त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

अश्विनी वाघमळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठामपा

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ठाणे : महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मुंबई महानगर क्षेत्रातील ४० हजारांहून अधिक पालिका आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत बुधवारची सर्वसाधारण सभा तहकूब केली.

कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे शहरात संतापाची लाट पसरली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनंतर महिला अधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदविला होता. त्यापाठोपाठ मुंबई महानगर क्षेत्रातील पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ४० हजार पालिका आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी असून हे सर्वजण आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे बुधवारी महापालिकांचे काम संपूर्ण दिवस ठप्प झाले होते.

सर्वसाधारण सभा तहकूब

महिला सहायक आयुक्त पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत सर्वसाधारण सभा पूर्णवेळ तहकूब करण्याची मागणी भाजपचे गटनेते मनोहर डुम्बरे यांनी केली. असे हल्ल्याचे प्रकार घडू नयेत म्हणून चर्चा करून ठोस निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांची चर्चेची तयारी असेल तरच चर्चा घडवून आणण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यास शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी पाठिंबा दिला. यासंदर्भात दोन दिवसांची चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत मांडली. त्यास ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह इतर नगरसेवकांनी पाठिंबा देत सभा पूर्णवेळ तहकूब केली.

मनसे, भाजपकडून तीव्र निषेध

*  ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना दु:खद घटना आहे. पण, अशा प्रकारचा हल्ला करणाऱ्यांची हिंमत ठेचून काढली पाहिजे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच त्यांनी सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

* महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी सुरक्षित नाहीत. इथे गुंडाराज आहे, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. महिला अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. परंतु सध्याचे सरकार काय करत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विविध संघटना कार्यरत आहेत, परंतु त्यामध्ये महिलांचा समावेश नाही. त्यामुळे या संघटनांमध्ये महिलांची निवड होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली.