लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडी महापालिकेच्या शाळा क्रमांक २७ मधून सात संगणक, प्रिंटर, पेटीमध्ये ठेवलेले शैक्षणिक साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीनंतर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी येथील घासबाजार परिरात भिवंडी महापालिकेची शाळा क्रमांक २७ ही शाळा आहे. शाळेची इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीला सुमारे दोन वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या शाळेला शाळा क्रमांक २४ मध्ये भरविले जात आहे. शाळेच्या शिक्षकांनी शाळेतील साहित्य शाळा क्रमांक २४ मध्ये नेले होते. परंतु काही साहित्य शाळा क्रमांक २७ च्या जुन्या इमारतीमध्येच ठेवण्यात आले होते. शिक्षकांना साहित्य लागल्यास तेथून आणले जात होते.

दोन महिन्यांपूर्वी शाळेसाठी २४ खुर्च्या कमी पडल्या होत्या. त्यामुळे शाळेचे शिक्षक तेथील मुख्याध्यापक कार्यालयात जावून तेथून खुर्च्या आणल्या. त्यावेळी सर्व साहित्य शाळेमध्ये होते. त्यानंतर १२ एप्रिलला काही कामानिमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांसह शाळेमध्ये गेले असता, मुख्याध्यापक कार्यालयाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.

शिक्षकांनी कार्यालयात पाहिले असता, कार्यालयातील कपाट तुटलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी कार्यालयात ठेवलेले सात संगणक, प्रिंटर, पेटीमध्ये ठेवलेले शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये एक दुर्बिण तसेच इतर साहित्यांचा सामावेश होता. हे साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले. या साहित्यांची एकूण किंमत ४७ हजार रुपये इतकी आहे. यानंतर मुख्याध्यापकांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.