नियोजनबद्ध वसलेले नवी मुंबई शहराचे वर्णन ‘उद्यानांचे शहर’ असे केले तर ते चुकीचे ठरू नये. हिरवाई राखण्यासाठी आणि स्थानिक रहिवाशांच्या मनोरंजनासाठी या शहरात अनेक उद्यानांची निर्मिती करण्यात आली. सानपाडा ते बेलापूर या पट्टय़ात तर अनेक थीम पार्क आहे. नेरूळ येथील ‘रॉक गार्डन’ हे त्यापैकीच एक. नेरूळ स्थानकापासून चालत १० मिनिटे अंतरावर असलेले हे उद्यान नवी मुंबईकरांचे सर्वाधिक पसंतीचे प्रेक्षणीय स्थळ आहे.
नेरूळमधील सेक्टर २१मध्ये वसलेल्या रॉक गार्डनचे खरे नाव ‘संत गाडगेबाबा उद्यान.’ मात्र ४० हजार चौरस मीटर जागेत वसलेले हे सदाहरित उद्यान रॉक गार्डन म्हणूनच प्रसिद्ध आहे. महापालिकेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून मिळालेल्या निधीतून हे उद्यान साकारण्यात आले.
या उद्यानाचे वैशिष्टय़ म्हणजे अश्मयुगापासून संगणक युगापर्यंतची माहिती या उद्यानात विविध शिल्पांद्वारे मिळते. अग्नीचा शोध लागल्यानंतर अश्मयुगीन लोक त्याचा कशा प्रकारे वापर करत हे एका शिल्पाद्वारे दिसून येते. भारतीय संस्कृतीचा आविष्कार घडविणाऱ्या तीन भिंती येथे साकारण्यात आल्या आहेत. एका भिंतीवर शस्त्रास्त्रे तर दुसऱ्या भिंतींवर भारतीय संगीत परंपरेची प्रतीक असलेली वाद्य्ो आहेत. तलवार, भाले, धनुष्यबाण, कुऱ्हाडी, ढाल आदी शस्त्रास्त्रे पाहताना मन हरखून जाते, तर वाद्यांच्या भिंतीवर असलेली डफ, तुणतुणे, तबला, तुतारी, पखवाज आदी पाहताना मन संगीतमय होऊन जाते.
नृत्यांगनांचे फायबरचे पुतळे, भिंतीवर साकारलेली वादकांची शिल्पे, मोठय़ा खडकावर उभ्या असलेल्या मुलांचे पुतळे आदी आकर्षक शिल्पाकृती या उद्यानात आहेत. उद्यानातील एका बाजूस असलेला संत गाडगे महाराज यांचा भलामोठा पुतळा लक्ष वेधून घेतो. हातात काठी असलेला आणि बाजूला ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ आदी लिहिलेला हा पुतळा खूपच आकर्षक आहे.
या उद्यानाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथील रंगबेरंगी फुलझाडे. विविध प्रकारची, विविधारंगी फुलझाडे येथे आहेत. त्यामुळे हे उद्यान नेहमीच सदाबहार वाटते. हिरवाईने नटलेल्या या उद्यानात आकर्षक कारंजी आणि एक कृत्रिम धबधबा साकारण्यात आला आहे. हा धबधबा कृत्रिम असला तरी त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसते. धबधब्यावर पाणी पिण्यासाठी आलेले प्राणी, बागडणारी हरणे यांची शिल्पे तर अधिकच आकर्षक वाटतात.
१२ राशी, २७ नक्षत्रे यांची माहिती देणारे उद्यान, तुळशी रोपांचे उद्यान यांमुळे विज्ञानाविषयी माहिती येथे मुलांना मिळते. आकर्षक खेळणे, झोपाळे, मिनी ट्रेन यांमुळे लहान मुलांना येथे मनसोक्त खेळण्याची आणि बागडण्याची मजा मिळते. या उद्यानात अॅम्पी थिएटर असल्याने विविध कार्यक्रमही येथे होतात.
दगड प्रवेशद्वार असलेल्या या उद्यानाच्या प्रवेशद्वाजवळच उद्यानाची वेळ आणि शुल्क यांची माहिती आहे. नवी मुंबईतील हे उद्यान देखणे व आकर्षक असल्याने येथे भेट देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मन प्रसन्न करणारे आणि शहरातील धकाधकीच्या वातावरणापासून दूर असलेले हे उद्यान ‘रॉक’ आनंद देते.
रॉक गार्डन, नेरूळ, नवी मुंबई (संत गाडगेबाबा उद्यान)
कसे जाल?
- नेरूळ सेक्टर २१मध्ये हे उद्यान वसविण्यात आले आहे. नेरूळ रेल्वे स्थानकापासून चालत १० मिनिटांत येथे पोहोचता येते.
- रेल्वे स्थानकापासून रिक्षाने या उद्यानापर्यंत पोहोचता येते.
- वेळ : सायंकाळी : ५ ते ९
- प्रवेश शुल्क (वयोगट ५ ते १२) : २ रुपये १२ वर्षांवरील : ५ रुपये