डोंबिवली: शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना बेदम मारहाण केल्याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार तातडीने लोकलने प्रवास करत डोंबिवलीत दाखल झाले. शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन त्यांनी घडल्या घटनेची मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सादिया पिंजारी यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करून, रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना बुधवारी संध्याकाळपर्यंत अटक करा, अन्यथा गुरूवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आंदोलन करील, असा इशारा दिला.

रुग्ण सेवक डाॅक्टरांना एक नगरसेवक अर्वाच्च भाषेत आई, बहिणीवरून शिवीगाळ करत असेल, फाईली डाॅक्टरांच्या डोक्यात जीवघेण्या पध्दतीने मारत असेल तर पोलिसांनो, सरकारला आपण सांगत आहोत की अशा नगरसेवकाच्या दारात पोलीस वाहन नेऊन त्याला अटक करण्यापेक्षा त्याचे सर्व कपडे काढा. त्यांची अंतवस्त्रावर धिंड काढा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल.

नेता, नगरसेवक, गुंड असो कोणीही गरीबावर अन्याय करत असेल, रुग्ण सेवक डाॅक्टरांना मारझोड करत असेल तर त्याची अशाच प्रकारची राज्यात धिंड काढली जाते, असा एक संदेश महाराष्ट्रात जाईल. यानिमित्ताने सरकार चांगले काम करते असेही लोकांना कळेल. अशाप्रकारची कारवाई करण्याची हिम्मत आहे का या सरकारमध्ये, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला.

आपल्या खास जवळचा माणूस असेल मग तो नगरसेवक, गुंड असेल आणि तो नको ती कामे करत असेल, डाॅक्टरांना घाणेरड्या शिव्या देऊन लोकसेवेच्या नावाखाली वावरत असेल तर असा नगरसेवक सत्कार करण्याच्या लायकीचा नाही. उलट तो सत्कार करण्याच्या लायकीपेक्षा धिंड काढण्याच्या लायकीचा आहे, असे आपले ठाम मत आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने बुधवारी संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रे यांना अटक करा. त्यांच्यावरील दाखल गुन्हा हा अजामिनपात्र आहे. त्यामुळे त्यांना तातडीने अटक होणे आवश्यक आहे. याप्रकरणी नुसती कायदेशीर कारवाई करतो, अशी भूमिका घेऊ नका. शेवटी वर्दीचा आम्ही नेहमीच सन्मान करतो, मान ठेवतो. पण तुमच्याकडून अशावेळी अन्याय झालेल्या रुग्ण सेवकांना न्याय दिला जाणार नसेल. अशा नगरसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आज तातडीेने म्हात्रे यांना अटक करा. तसे झाले नाहीतर मात्र गुरूवारी डाॅक्टरांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार पवार यांनी दिला.

शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीने रमेश म्हात्रेंवर कारवाई करण्याच्या ट्वीवटचा संदर्भ देत त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना तातडीने अटक होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.

यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, प्रदेश नेते महेश तपासे, वंडार पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत सावंत, समीर म्हात्रे, डाॅ. मंगेश पाटे, भाऊ पाटील उपस्थित होते.