scorecardresearch

ठाणे महापालिकेने जलमापकांद्वारे केली ४४ कोटी रुपयांच्या देयकांची वसुली

७५ हजार नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम पूर्ण

(संग्रहीत छायाचित्र)

ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण २ लाख २३ हजार नळ जोडण्यांपैकी ७५ हजार नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ‌उर्वरित ठिकाणी जलमापके बसविण्याची कामे सुरुच आहेत. असे असले तरी जलमापके बसविलेल्या ग्राहकांकडून जलमापकाच्या नोंदणीप्रमाणेच देयक वसुल करण्याचे काम पालिकेने गेल्या वर्षभरात केले असून, अशा ग्राहकांकडून आतापर्यंत ४४ कोटी २० लाख रुपयांची पाणी देयकांची वसुली झाल्याची माहिती समोर आली आहे.

शहरात एकूण २ लाख २३ हजार नळ जोडणीधारक –

ठाणे महापालिका शहरातील झोप़डपट्टीधारकांकडून ठोक पद्धतीने तर, इमारतीमधील सदनिकाधारकांकडून चौरस फुटानुसार पाणी देयकांची वसुली करते. यामुळे पाणी वापरावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे अनेक भागात पाण्याचा बेसुमार वापर होतो. झोप़डपट्टी भागात घरासमोरील रस्ते धुणे, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय घेतला होता. शहरात एकूण २ लाख २३ हजार नळ जोडणीधारक असून त्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक नळजोडणीधारकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख १३ हजार ३२८ न‌ळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय घेऊन पालिकेने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली होती. आतापर्यंत केवळ ७५ हजार नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम पुर्ण झाले असून ‌उर्वरित ठिकाणी जलमापके बसविण्याची कामे सुरुच आहेत.

जलमापके बसविलेल्या ग्राहकांकडून जलमापकांच्या नोंदणीप्रमाणेच देयक आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु झोपडपट्टीधारक, सदनिकांना आणि जलमापके बसविलेल्या नळजोडणीधारक अशा सर्वांना वेगवेगळ्या दराची देयके देण्यात येत होती. यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने लोकप्रतिनिधींनी पुर्वीप्रमाणेच देयके वसुल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत केला होता. परंतु हा ठराव वेळेत प्राप्त झाला नसल्याचे सांगत पालिकेने जलमापकांच्या नोंदणीप्रमाणेच देयकाची वसुली सुरु ठेवली होती. अशा प्रकारे पालिकेने आतापर्यंत ४४ कोटी २० लाख रुपयांची पाणी देयकांची वसुली केली आहे.

वसुलीचा आकडा १२० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता –

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला १५८ कोटी रुपयांच्या पाणी देयक वसुलीचे उद्दीष्ट आखून देण्यात आले होते. त्यापैकी ११३ कोटी ९३ लाख ९८ हजार ८२ रुपयांची वसुली पालिकेने केली आहे. त्यात जलमापक नसलेल्या नळ जोडणीधारकांकडून ६२ कोटी २९ लाख ४९ हजार ८१९ रुपयांची तर जलमापकधारकांकडून ४४ कोटी २० लाख ६९ हजार ८३८ रुपयाची वसुली केली आहे. याशिवाय, पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात ७ कोटी ४३ लाख ७८ हजार ४२५ रुपयांची वसुली झाली आहे. येत्या काही दिवसांत ४५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे पाणी पुरवठा विभागासमोर आव्हान असले तरी वसुलीचा आकडा १२० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता पालिका सुत्रांकडून वर्तविली जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rs 44 crore recovered through water meter in thane msr

ताज्या बातम्या