कल्याण – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण देशात होणाऱ्या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून पंचपरिवर्तन, हिंदू नारेटिव्ह व आवश्यकता असेल तेथे लव्ह जिहाद सारख्या विषयाबाबत प्रत्यक्ष संघर्ष करून संघटित हिंदू शक्ती दाखवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्म जागरण गतिविधिचे प्रांत संयोजक राजेश कुंटे यांनी रविवारी कल्याण येथे केले. ते कल्याणात सुभेदार वाडा हायस्कूलच्या पटांगणात सिद्धेश्वर आळी वस्तीतर्फे आयोजित केलेल्या हिंदू संमेलनामध्ये बोलत होते.
यावेळी संमेलन अध्यक्ष प्रकाश लेले, राष्ट्र सेविका समिती सह कार्यवाहीका पद्मजा अभ्यंकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोमाता पूजन, कुमारीका पूजन करण्यात आले. राम नाम जप व स्तोत्रपठण झाले. व्यासपीठावर विविध राष्ट्रीय नेत्यांचे पेहराव, पोशाख घालून लहान मुलांनी ”श्रीराम पदविन्यास” केला.
या संमेलनात राजेश कुंटे यांनी सांगितले, देशात हिंदूंचा प्रजनन दर कमी होत असून स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी २०४७ साली जर हिंदू अल्पसंख्यांक झाला तर देश पुन्हा एकदा तुटू शकतो. देशात नरेटीव्हच्या लढाईमध्ये हिंदू समाजावर बौद्धिक आक्रमणे करून देशाला खिळखिळे करण्याचा डाव मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामध्ये पाश्चात्यशक्तींचाही मोठा सहभाग आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हिंदू समाजाचा आत्मविस्मृतीचा रोग दूर करण्यासाठी झाला होता. यामुळे संघाला १०० वर्षे झाली तरी हा रोग पूर्ण बरा न होणे ही अभिमानाची गोष्ट संघाला वाटत नाही. म्हणून शताब्दीचा उत्सव साजरा न करता सकल हिंदू समाजाला एकजूट करून व्यापक प्रमाणावर हिंदू संमेलने आयोजित केली जात आहेत. यावेळेस त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षाची वाटचाल चार टप्प्यांमध्ये कशी झाली आहे हे विस्तृतपणे सांगितले.
संघाबरोबरच कम्युनिस्ट पक्षाची शंभर वर्षांपूर्वी स्थापना झाली. आज कम्युनिस्ट पक्ष कुठे दिसत नाही, पण संघाची व्याप्ती मात्र चहूबाजूनी होत असल्याचे दिसते, असे ते म्हणाले. संमेलन अध्यक्ष प्रकाश लेले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये या हिंदू संमेलनाची गरज काय आहे हे सांगून यासाठी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. हे हिंदू संमेलन झाल्यावर आमचे कार्य थांबणार नसून हिंदू समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम व कार्यक्रम करून ही जागृती अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल असे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पळणीटकर, सायली परांजपे यांनी केले.
या कार्यक्रमास भाजपा प्रदेश पदाधिकारी नरेंद्र पवार, नगरसेवक अमित धाक्रस, कल्याण जनता बँकेच्या अध्यक्षा ॲड. संपदा संपदा कुलकर्णी ,डॉ. समीर भातखंडे ,डॉ. श्रीनिवास दातार ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दिनेश पटेल व विभाग प्रचारक संदीप नेवे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिद्धेश्वर आळी परिसरातील शंभर ते दीडशे स्वयंसेवक कार्यरत होते.
