ठाणे – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्यासाठी उद्या, ३१ मार्च शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या पाल्याचा आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरला नसेल तर त्यांचा लवकरात लवकर अर्ज भरावा असे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी आरटीई कायद्यात ३ किमी ऐवजी १ किमी अंतराच्या आतील शाळा निवडाव्या अशी नवीन नियमावली घालण्यात आली होती. या नव्या नियमावलीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या नव्या नियमावलीला सर्वच स्तरातून विरोध करण्यात आला. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट रद्द केली.
तसेच घरापासून ३ किमी ते ५ किमी पर्यंत अंतरातील शाळा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला. अर्जातील दुरुस्तीसाठी तसेच नव्या नियमावली मुळे ज्या पालकांना अर्ज भरता आला नव्हता, त्यांना ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून अद्याप ही ज्या पालकांनी अर्ज भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
ही मुदतवाढ शेवटची ?
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ करिता १७ फेब्रुवारी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला १७ फेब्रुवारी ते १६ मार्च पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतू, या कालावधीत पालकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे अर्ज भरण्याची मुदत २५ मार्च पर्यंत करण्यात आली. त्यानंतर, पुन्हा ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही शेवटची मुदतवाढ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
