ठाणे : दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित तसेच विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १० मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. परंतु ही मुदत आता वाढविण्यात आली आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदाच्या म्हणजेच, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली असून १० मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

पालकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शाळांनीही ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे पात्र वंचित व दुर्बल घटकांतील बालकांच्या पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

पालकांना अर्ज भरण्यासाठी शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालये तसेच बालकांच्या पालकांनी शासनाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.