ठाणे – शिक्षण हक्क कायदा (Right to Education) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळावा यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी करणे अवश्यक असते. त्यासाठी सुरुवातीला १९ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे शाळा नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
शाळा पडताळणी (School Verification) साठी संबंधित संकेतस्थळावरील लिंक कार्यान्वित करण्यात आली होती. शुक्रवारी ९ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची होती. परंतू, दिलेल्या मुदतीत आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांनी या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, शाळा नोंदणी व शाळा पडताळणीसाठी आता, २७ जानेवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून ही अंतिम मुदत असणार आहे. या कालावधीत संबंधित सर्व विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातील सूचना सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी तसेच पंचायत समितींचे गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या असून, आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा पडताळणी करताना विशेष दक्षता घ्यावी
शाळा पडताळणी करताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित (Relocated) झालेल्या शाळा या आरटीई कायद्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाळांना ज्या शिक्षण मंडळाची (Board) मान्यता आहे, तेच मंडळ शाळा नोंदणी करताना निवडले आहे का, याची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारची चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती नोंदवली जाणार नाही, याबाबत शाळा प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात केवळ ४३९ शाळांची नोंदणी
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी ६०० हून अधिक शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. परंतू, यंदा ठाणे जिल्ह्यातून केवळ ४३९ शाळांची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासना मार्फत राबवण्यात येते. त्यामुळे संबंधित शाळा प्रशासनाने या प्रक्रियेस गांभीर्याने घेऊन दिलेल्या अंतिम मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. – बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे.
