दोन वर्षांत केंद्राची उभारणी, ७०० वाहनांची दररोज तपासणी

भगवान मंडलिक

कल्याण : कल्याण पूर्व रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावरील मौजे नांदिवली तर्फे गाव हद्दीत परिवहन विभागाने ठाणे, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागांसाठी संगणकीकृत स्वयंचलित वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारणीची तयारी केली आहे. या केंद्रातून ठाणे, कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील अवजड वाहने तसेच मोटारींची तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्याची कामे केली जाणार आहेत. येत्या दोन वर्षांत या केंद्राची उभारणी केली जाणार आहे.

ठाणे, कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी स्वत: वाहनांची तपासणी करतात आणि त्यानंतर त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करतात. त्यात बराच कालावधी जातो. सध्या नांदिवली येथून ही कामे केली जात आहेत. ठाणे विभागातील २५० अवजड वाहने, १२५ हलकी वाहने, कल्याण विभागातील १४० वाहने या केंद्रावर तपासून त्यांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. स्वयंचलित केंद्र सुरू झाल्यानंतर या केंद्रावर दोन्ही विभागातील ६०० ते ७०० वाहनांची एका वेळी तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली. ‘भारतीय स्वयंचलित संशोधन’ विभागातर्फे या केंद्राची उभारणी होणार आहे. ‘सीआयआरटी’ संस्थेचे या उभारणीस तंत्रसाहाय्य मिळणार आहे. नवीन पद्धतीत संगणकीकृत स्वयंचलित यंत्रणेच्या रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रावर तपासणी वाहन आणून उभे केले जाईल. ते यंत्र वाहनाची सक्षमता संगणकाच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने तपासेल. वाहन सक्षम असेल तर त्याला स्वयंचलित पद्धतीने यंत्रातून योग्यता प्रमाणपत्र मिळेल, असे ठाण्याचे मोटार वाहन निरीक्षक झेड. एम. काझी यांनी सांगितले.

वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या यंत्रणेमुळे राज्याच्या इतर भागातील वाहनांचीही या ठिकाणी तपासणी करून त्यांना योग्यता तपासणी प्रमाणपत्र केंद्र देणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे, असे तानाजी चव्हाण यांनी सांगितले. प्रशिक्षित वाहनचालकांसाठी २५० मीटरचा ड्रायिव्हग टेस्ट ट्रॅक नांदिवली केंद्रात विकसित केला जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

‘खासगी यंत्रणेद्वारे या यंत्रणा चालविताना परराज्यासारख्या समांतर योग्यता प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था सक्रिय होणार नाहीत याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे. अन्यथा योग्यता प्रमाणपत्र केंद्रांच्या बाहेर काही दलाल दुकाने उघडून दामदुप्पट शुल्क आकारून कोणत्याही वाहनाला योग्यता प्रमाणपत्र देतील, यावर करडी नजर शासन, परिवहन विभागाला ठेवावी लागेल, असा धोका काही निवृत्त परिवहन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नांदिवली येथे अवजड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी स्वयंचलित केंद्र उभारले जाणार आहे. ठाणे, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागांतील वाहनांना या केंद्रावर योग्यता प्रमाणपत्रे दिली जातील. अत्याधुनिक यंत्रणेमुळे वाहने तपासणीचा वेग वाढणार आहे.

तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,  कल्याण.