कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या दोन महिन्यांत रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणातून ६ कोटी ४२ लाख ११ हजार ९०८ रुपयांचा महसूल मिळविला आहे. या कालावधीत १ हजार ७७२ परवाने नूतनीकरण करण्यात आले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.
अनेक रिक्षा चालकांचे परवाने विविध कारणांमुळे रद्द झालेले असतात. हे रिक्षा चालक बेकायदा रिक्षा चालवू नये म्हणून त्यांना एक संधी म्हणून त्यांचे परवाने नूतनीकरणाचा कार्यक्रम उपप्रादेशिक कल्याण कार्यालयाने गेल्या दोन महिन्यांपासून राबविला. या उपक्रमाला रिक्षा चालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी राजेश सरक, रवींद्र कुलकर्णी, रमेश साळवी यांच्या पथकाने ही कर वसुली केली. नुतनीपरणातून २ कोटी ५० लाख ४२ हजार महसूल, योग्यता प्रमाणपत्र शुल्कातून ३ कोटी ५१ लाख ४० हजार आणि वसुली कर वसुलीतून ४ लाख २९ हजार रुपयांचा महसूल मिळाला, असे नाईक यांनी सांगितले. ही विक्रमी वसुली असल्याचे सांगण्यात आले.