एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर माजी आमदार सुभाष भोईर आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची नियुक्ती झाल्याचे असे वेगवेगळे संदेश समाज माध्यमांवर रविवारी रात्री प्रसारित झाले. समाजमाध्यमांवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही सुरु झाला. अखेर अशी कोणतीही नियुक्ती झाली नसल्याचे केदार दिघे यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले आणि त्यानंतर समाज माध्यमांवरील नियुक्तीच्या पोस्ट हटविण्यास सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांचे समर्थन करत नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पक्ष विरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हस्के यांची पक्षातून हकालपट्टी केली. जिल्ह्यातील आणि शहरातील अनेक पदाधिकारी शिंदे यांचे उघडपणे समर्थन करत असतानाच दुसरीकडे पक्षाची जबाबदारी अद्याप कुणाकडेही देण्यात आलेली नाही. म्हस्केच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी आहे तिथेच आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे – सुभाष भोईर

एकीकडे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी शिंदे यांचे समर्थन करीत असतानाच, दुसरीकडे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी आपले समर्थन उद्धव ठाकरे यांना जाहीर केले आहे.ज्या नेत्यांनी भोईर यांच्यावर अन्याय केला त्यांनीच आता बंडखोरी केल्याने त्या संधीचा फायदा घेत जुने उट्टे काढत भोईर यांनी “मी आहे तेथेच आहे. उद्धव साहेब यांच्या सोबतच राहणार आहे.” असे जाहीर करून मी बंडखोरांसोबत नसल्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती होईल अशी चर्चा सुरु असताना त्यांच्या नियुक्तीचे आणि अभिनंदनाचे संदेश रविवारी रात्री समाज माध्यमांवर प्रसारित झाले. मात्र, काही वेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

शिंदे यांनी बंड केला, त्याच दिवशी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सुद्धा शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे तेच जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती होईल अशी चर्चा सुरु असतानाच त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित झाले. त्यावर अभिनंदनाच्या वर्षावाही सुरू झाला. अखेर, आशा प्रकारची माझी वा कोणाचीच नियुक्ती अधिकृतपणे या क्षणापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी केलेली नाही, असे केदार दिघे यांनी समाज माध्यमांवर स्पष्ट केले. शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षसाठी काम करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumors on social media about appointment of thane shiv sena district chief msr
First published on: 27-06-2022 at 13:01 IST