ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील विकास प्रकल्पांमुळे जमीन, रोजगार व पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण झालेल्या भूमिपुत्रांना एकत्र आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सागरी भूमिपुत्र महासंघाच्या स्थापना सोहळ्यात शरद पवार यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या लढ्याचा संदर्भ देत भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्याकडे भूमिपुत्रांच्या प्रश्नांची धुरा सोपविल्याचे संकेत दिले. दि. बा. पाटील यांनी अनेक आंदोलने करून स्थानिकांना न्याय मिळवून दिला. आता ही जबाबदारी सुरेश म्हात्रे यांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्र एकवटले असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) केले.
मुंबई महानगर प्रदेशातील विकास प्रकल्पांमुळे बाधित स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांना एकत्रित व्यासपीठ देण्यासाठी मंगळवारी ठाण्यात ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना करण्यात आली. आगरी, कोळी, कुणबी व बारा बलुतेदार समाजातील सर्वांना एकत्र घेऊन भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला. या महासंघात आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी व बारा बलुतेदार समाजासह शेतकरी, मच्छीमार व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा समावेश करण्यात येणार आहे.
ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यांतील गावठाणे, कोळीवाडे, घरांची पुनर्बांधणी, जमीन, रोजगार व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न महासंघाच्या माध्यमातून मांडले जातील. सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, जेएनपीए, बुलेट ट्रेन, वसई-विरार-अलिबाग कॉरिडॉर, सागरी किनारा मार्ग व वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांमुळे बाधित शेतकरी व मच्छीमारांचे जमीन, रोजगार व पुनर्वसनाचे प्रश्नही सोडविण्यासाठी हा महासंघ स्थापन करण्यात आला आहे.
‘पाठीशी उभे राहा’ या महासंघाच्या स्थापनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार होते. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत महासंघाला शुभेच्छा दिल्या. लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्थानिकांसाठी आंदोलने केली व त्यांना न्याय मिळवून दिला. आता महासंघाच्या माध्यमातून ही जबाबदारी सुरेश म्हात्रे यांनी घेतली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी म्हात्रे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुंबई महानगर प्रदेशातील वाढते शहरीकरण व विविध विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे तसेच प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना महासंघाच्या माध्यमातून एकत्रितपणे वाचा फोडता येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिकांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे विषय या महासंघामुळे मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.
