ठाणे : ‘कैसे हराया?’ म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जातीचा दाखला मिळविल्याच्या आरोपवरून चौकशी सुरू आहे. या दाखल्यामुळे सहर यांचे नगरसेवक पद धोक्यात आल्याची चर्चा असतानाच, या प्रकरणावर एमआयएम पक्षाचे गटनेते सैफ पठाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मोठा दावा केला आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेली सर्व कागदपत्रे पूर्णपणे अधिकृत असून ती बोगस नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत लवकरच सविस्तर खुलासा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून सहर शेख विजयी झाल्या आहेत. सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते, सहर शेख या सुद्धा वडिलांसोबत पक्षाचे काम करत होती. यामुळे सहर यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा भागातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने उमेदवारी नाकारली. यामुळे सहर यांनी एमआयएम पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. यात विजयी झाल्यानंतर त्यांनी एका सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘कैसे हराया?’ असे म्हटले होते. त्या वाक्याची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, सहर यांचे वडील युनूस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल केली होती.

यात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनूस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर ओबीसी प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना-८ चा चुकीचा वापर करून जात दाखला मिळवला, असा आरोप करण्यात आला होता. त्याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले असून त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे तहसीलदारांनी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल ठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

नगरसेवक पद धोक्यात?

अहवालात ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतर होणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यावर आता एमआयएम पक्षाचे गटनेते सैफ पठाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मोठा दावा केला आहे.

गटनेते सैफ पठाण काय म्हणाले

विरोधक आणि तक्रारदारांकडून या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे. तसेच, युनिस शेख आणि त्यांची मुलगी, नगरसेविका सहर शेख, स्वतः माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार आहे. काही घरगुती कारणांमुळे दोघांना अद्याप माध्यमांशी संवाद साधता आला नसून, सध्या ते मुंबईत नातेवाईकांकडे आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बोगस नसून ती पूर्णपणे अधिकृत आहेत. सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात वकीलांच्या टीमशी चर्चा सुरू असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर खुलासा करण्यात येईल. तसेच वेळप्रसंगी जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च व सुप्रीम कोर्टात देखील धाव घेवू, असे पठाण यांनी म्हटले आहे.