ठाणे : महापालिका निवडणूकीचा निकाल अनेक ठिकाणी अनपेक्षित असा लागला आहे. एमएमआय पक्षाला या निवडणूकांमध्ये उभारी मिळाल्याचे दिसत आहे .राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमने १२५ जागा जिंकल्या आहेत. ठाणे महापालिका निवडणूकीत देखील एमआयएमच्या १४ उमेदवारांमधून पाच उमेदवार विजयी झाले आहेत.
मुंब्य्रातील प्रभाग क्रमांक ३० मध्ये संपूर्ण एमआयएमचे पॅनल निवडून आले. हे पॅनल निवडूण येताच त्यातील नवर्निनाचित नगरसेवक सहार शेख यांनी मोठे विधान केले आहे की, ‘पुढच्या निवडणूकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू’…त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. परंतू, या सहारा शेख नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय याची चर्चा आता होऊ लागली आहे.
राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्या. राज्यातील २९ महापालिकांमध्ये पार पडलेल्या या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष करुन मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई या महापालिका निवडणूकांची चर्चा सर्वाधिक रंगल्याची पाहायला मिळाली. ठाणे महापालिका निवडणूकीत जरी शिवसेना (शिंदे ) पक्षाने सर्वाधिक जागा मिळवून गड राखला आहे. त्यापाठोपाठ भाजप आणि मग इतर पक्ष असा क्रम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा जरी एक उमेदवार आला असला तरी मताधिक्यांमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक लागत आहे.
तर, कळवा-मुंब्रा शहराचे चित्र बघता हे दोन्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या शहरात दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाल्याचे दिसते. एमएमआयच्या उमेवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणूकीत एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते. परंतू, यंदा पाच उमेदवार विजयी झाले आहेत.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमचे उमेदवार नफिस अन्सारी, सहार युनूस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. या प्रभागातून अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतू, दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तर ती या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. या प्रभागात एमआयएमच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. त्यातील सहार युनूस शेख या तरुणीने समाजमाध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिची भाषण, प्रचार रॅली, प्रचार सभा समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल होत होत्या.
पुढच्या निवडणूकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू…
विजयानंतर सहार युनूस शेख हिचे आणखी एक भाषण समाजमाध्यमांवर प्रचंड प्रसारित होत आहे. त्यात ती म्हणाली आहे की, पुढच्या निवडणूकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवे करुन टाकू…मुंब्य्रातून विरोधकांना पळवून लावूया. पुढच्या निवडणूकीत मुंब्य्रात निवडूण येणारा प्रत्येक उमेदवार हा एमआयएमचा असेल, तिच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
युनूस शेख यांची आव्हाडांवर टीका
युनूस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात एकेकाळी चांगले मैत्री संबंध होते. मागील काही वर्षांपासून त्यांच्या राजकीय वाद निर्माण झाला होता. यंदाच्या महापालिका निवडणूकीत युनूस शेख यांनी त्यांच्या मुलीला म्हणजेच सहार शेख हिला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. सहारा हिचे संपूर्ण पॅनल सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आले. त्यानंतर, युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. माझ्या नादाला लागायचं नाही नाहीतर, मी वाट लावेल. ज्यांना तुम्ही घेऊन फिरतात ते पांडू लोग आहेत इथे सर्व वाघ आहेत त्यामुळे आमच्या मध्ये आलात तर परिणाम गंभीर होतील अशी टीका युनूस शेख यांनी आव्हाडांवर केली आहे.
