ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करणाऱ्या आणि त्यानंतर पोलिसांना माफीनामा देणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी माफीनाम्याबाबत मोठे विधान केले आहे. “ मी माफीनामा दिलेला नाही तर, त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे, असे तिने म्हटले आहे.
मुंब्रा शहरातून एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहार युनूस शेख या चांगल्याच चर्चेत आल्या. सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो. या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी ” कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले होते.त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्याकडून तक्रारी दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी तिची चौकशी केली. यादरम्यान, तिने माफीनामा लिहून देत सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाच्या झेंडा आणि निशाणीच्या संदर्भात होते, असे तिने स्पष्ट केले आहे. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंद केले आहे.
सहर शेखने दिलेल्या माफीनाम्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्य्रात येऊन तीची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी तिच्या वक्तव्याची पाठराखण केली. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही ती उघडपणे मांडत राहू. नगरसेविकेवर अनावश्यक दबाव टाकला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही बैठक घेऊन स्पष्ट सांगितले की, हे आमच्या पक्षाचे मत आहे.
आमच्यावर तक्रारी दाखल केल्या जात आहेत, कारवाईची भाषा केली जात आहे. पण कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई करणार, कोणत्या कलमान्वये नोटीस देण्यात आली आहे. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून कायद्याची मनमानी अंमलबजावणी करणार का, कोणत्या कलमामध्ये याची तरतूद आहे, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. सहार शेख हीने केलेल्या विधानाबाबत आम्ही माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले.
पोलिसांना लिहून दिलेल्या माफीनाम्याबाबत सहर शेख यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, “ मी माफीनामा दिलेला नाही तर, त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे, असे तिने म्हटले आहे. मुंब्रा येथे झालेल्या सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाच्या झेंड्याबाबत होते. आमच्या पक्षाचा आणि आणखी काही पक्षांच्या झेंड्यांचा रंग हिरवा आहे. त्यामुळे ते सुद्धा अशी विधाने करतात. तसेच शहर भगवे करू असे विधान काही पक्ष करतात. मी तसेच विधान केले होते. पण, त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे आरोप लावले. अनेक लोक जाती धर्माचे राजकारण करत असून ते चुकीचे आहे, असे तिने म्हटले.
