Sahar Sheikh At Thane Mayor Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीनंतर महापौर पदांसाठी निवडणूका पार पडल्या. त्यानुसार, ठाणे महापालिका महापौर निवडणूक आज पार पडली. यावेळी सर्व पक्षाचे नगरसेवक पालिकेत उपस्थित होते. ‘कैसे हराया…’ म्हणणाऱ्या सहर शेख यांनी देखील ठाणे महापालिकेत उपस्थिती लावली होती. त्यावेळी सहर शेख माध्यमांशी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून एमआयएमचे पाच उमेदवार निवडून आले होते. यात, जितेंद्र आव्हाड यांचा एकेकाळी निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या यूनुस शेख यांची मुलगी सहर शेख यांचा देखील समावेश आहे. सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा भागात ब्लाॅक अध्यक्ष म्हणून काम करत होते. मध्यंतरीच्या काळात आव्हाड आणि युनूस यांचे जमेनासे झाले होते. त्यामुळे सहर विजयी झाल्यानंतर यूनुस शेख यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली होती. तर, सहर यांनी देखील त्यांच्या भाषणात ‘पुढच्या निवडणूकीत संपूर्ण मुंब्य्राला हिरवा करुन टाकू’ असे वक्तव्य केले. तर, ‘कैसे हराया…’ असे म्हणत आव्हाडांना देखील डिवचले होते. या वक्तव्यावरुन सहर या समाजमाध्यमांवर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याचे क्लिप सर्वत्र पसरले होते. त्यानंतरही त्यांनी माध्यामांसमोर आपली प्रतिक्रिया ठामपणे मांडली आहे.

आज, महापौर निवडणूकीसाठी ठाणे महापालिकेत सर्वच पक्षाचे नगरसेवर हजर झाले होते. यावेळी सहर शेख यांनी देखील ठाणे महापालिकेत उपस्थिती लावली. महापालिकेत येताच त्यांना माध्यमांनी घेरले. त्यावेळी सहर शेख आता वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतू, सहर शेख यांनी कोणतेही वादग्रस्त विधान न करता त्यांनी केवळ यंदाच्या महापालिका निवडणूकीत एमआयएमचे पाच नगरसेवक निवडूण आले याचा आनंद व्यक्त केला.