Sahar Sheikh Disqualification Risk Thane : ठाणे महापालिका निवडणूक विजयानंतर राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘कैसे हराया?’ म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा

सहर शेख यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते, सहर शेख या सुद्धा वडिलांसोबत पक्षाचे काम करत होती. यामुळे सहर यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा भागातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.

परंतु पक्षाने उमेदवारी नाकारली. यामुळे सहर यांनी एमआयएम पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. यात विजयी झाल्यानंतर त्यांनी एका सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘कैसे हराया?’ असे म्हटले होते. त्या वाक्याची बरीच चर्चा झाली होती. असे असतानाच, आता बनावट जातीचा दाखल्याच्या आरोपमुळे एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी युनूस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. यात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनूस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर ओबीसी प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना-८ चा चुकीचा वापर करून जात दाखला मिळवला, असा आरोप करण्यात आला आहे. त्याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले असून त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सध्या चौकशी प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे तहसीलदारांनी १८ मार्च रोजी सुनावणी घेतली. परंतु आजाराचे कारण देत युनूस हे सुनावणीस गैरहजर राहिले. तर याच सुनावणीदरम्यान, त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत व काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा २३ मार्चला सुनावणी घेण्यात आली.

त्यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतर होणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

नेमके आक्षेप काय?

छायाप्रत दाखल्याच्या शीर्षकात महाराष्ट्र शासन उल्लेख नाही. दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही. युनूस यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरील वडिलांच्या नावात बदल असून त्याचबरोबर युनूस यांच्या काकांचा जात दाखला गाझियाबादचा आहे. स्थलांतरित अधिनियम २००० चे कलम ६ मधील नमुना १० चा अभाव आहे, असे आक्षेप असल्याची माहिती सूत्रांनी दिली.