First Sarvajanik Ganeshotsav History: सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण किंवा महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला की अनेकदा वेगवेगळ्या ऐतिहासिक दाव्यांवरून चर्चा रंगताना दिसते. मात्र, या विषयावर आता एका नव्या ऐतिहासिक पुराव्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि लेखक कौस्तुभ कस्तुरे यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका सविस्तर माहितीनुसार, सार्वजनिक गणेशोत्सवाची पहिली नांदी आणि पुढाकार संत रामदास स्वामी यांनी घेतल्याचे समोर आले आहे. उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे आणि ग्रंथांच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष मांडला आहे.

मंदिरांतील उत्सव ते सार्वजनिक उत्सव

महाराष्ट्रामध्ये गणपतीची आराधना प्राचीन काळापासून चालत आली आहे. इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे याबद्दल लिहितात की भाद्रपदातल्या उत्सवाबद्दल सांगायचे तर, चिंचवडकर देवांकरवी (मोरेश्वर गोसावी आणि त्यांचे वंशज) हा पाच दिवसांचा उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा होत असे. छत्रपती राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांच्या पत्रांमधून मोरगाव, थेऊर अशा ठिकाणी हा उत्सव होत असल्याचे संदर्भ मिळतात. मात्र, मोरगाव किंवा इतर ठिकाणचा हा उत्सव भाद्रपद प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत चाले आणि तो मुळातच मंदिरे असल्याने तिथल्या तिथे मर्यादित होता. समर्थ रामदास स्वामींनी मात्र याच्या पुढे जाऊन एका सार्वजनिक उत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, असे कस्तुरे यांनी स्पष्ट केले आहे.

समर्थ प्रताप ग्रंथातील महत्त्वाचा पुरावा

समर्थ रामदास स्वामींचे एक अत्यंत विश्वसनीय चरित्र म्हणजे गिरीधरस्वामीकृत ”समर्थप्रताप” हा ग्रंथ. या ग्रंथाच्या आठव्या समासात एक अत्यंत महत्त्वाचा चरण आढळतो.

“समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोनी पुरुष सिंदुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहछह दाविला। भाद्रपदमाघपर्यंत।। ” यातील ”सुंदरमठ” म्हणजे रायगडच्या आग्नेयेला असलेल्या वरंध घाटाच्या डोंगररांगेतील, शिवथरच्या पर्वतराजीत असलेली शिवथर घळ. गिरीधरस्वामींच्या या वर्णनावरून हे स्पष्ट होते की समर्थांनी शिवथरच्या घळीत गणेशोत्सव सुरू केला. सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे “सकळ प्रांतासि मोहछह दाविला “. यावरून हा उत्सव केवळ मठापुरता किंवा वैयक्तिक मर्यादित नसून, तो ”सकळ प्रांतासाठी” म्हणजे सर्वांसाठी खुला आणि ”सार्वजनिक” स्वरूपाचा होता, हे सिद्ध होते, असे कौस्तुभ कस्तुरे सांगतात.

कधी झाला हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव?

हा उत्सव नेमका कधी सुरू झाला, याचा निश्चित काळ ठरवणे थोडे अवघड असले तरी, तत्कालीन पत्रांच्या आधारे कौस्तुभ कस्तुरे यांनी याचा एक कालखंड निश्चित केला आहे. ८ ऑगस्ट १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड आणि महिपतगडच्या किल्लेदारांना पाठवलेल्या पत्रात समर्थ ”शिवथरी” राहत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तर नोव्हेंबर १६७६ मध्ये शिवाजी महाराज साताऱ्याला आजारी असताना समर्थ शिवथरच्या घळीतच होते, असा स्पष्ट उल्लेख कल्याण गोसावी यांच्या एका पत्रात आहे. सोबतच ३१ मार्च १६७६ या दिवशी महाराजांनी चाफळची नवी सनद लिहून दिली. त्यात महाराज म्हणतात, “आपण श्री सिवतरी असता त्यांचे भेटीस गेलो होतो “. म्हणजेच मार्च १६७६ च्या आधीपासूनच समर्थ शिवथर घळीत मुक्कामाला होते. नळ संवत्सर अर्थात मार्च १६७६ ते मार्च १६७७ दरम्यान समर्थांनी संभाजी महाराजांना सांगितले होते की, “नळ संवत्सरी सिवतरी (शिवाजी महाराजांनी) १८ शस्त्रे समर्पिली “. हा काळ ६ मार्च १६७६ ते २३ मार्च १६७७ असा येतो.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूळ शिवथर घळीत !

या सर्व ऐतिहासिक साखळीचा आणि कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट नक्की होते ती म्हणजे, समर्थ रामदास स्वामींचा मुक्काम इ.स. १६७५ ते १६७७ या दरम्यान शिवथर घळीत होता. याच काळात त्यांनी कधीतरी शिवथरच्या घळीत अर्थात सुंदरमठी गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि ”सकळ प्रांतासाठी” तो उत्सव खुला करून खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

गणपतीची जगप्रसिद्ध आणि सर्वांच्या मुखोद्गत असलेली ”सुखकर्ता दुखहर्ता” ही आरतीही समर्थांनी याच शिवथर घळीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान रचली असेल का, याबाबत सध्या तरी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी ती शक्यता नाकारता येत नाही असेही या संशोधनातून समोर येते. इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांच्या या सविस्तर मांडणीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सुवर्ण पानावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.