किशोर कोकणे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मालवाहू तसेच हलक्या वाहनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या साकेत पूल आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या महत्त्वाच्या दुरुस्तीचे काम अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे मुंब्रा बाह्यवळण मार्ग सहा महिने आणि साकेत पूल कमीत-कमी आठवडाभर बंद करावा लागणार होता.
ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा, राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत ही कामे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या रस्त्यांची कामे आता पावसाळय़ानंतरच केली जाणार आहेत. पावसाळय़ात खड्डे पडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मार्गावर मंगळवारपासून पुढील काही दिवस रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत तात्पुरती दुरुस्ती करणार आहे.
ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंब्रा बाह्यवळण मार्ग जातात. गेल्या वर्षी पावसाळय़ात मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर मोठे खड्डे पडले होते, तर मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदर पुलाची अक्षरश: चाळण झाली होती. दोन्ही महत्त्वाचे मार्ग असल्याने त्याचा फटका ठाणे, भिवंडीसह आसपासच्या शहरांना बसून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांना सहन करावा लागला होता. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते.
या वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून एमएसआरडीने साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कमीत-कमी आठवडाभराचा कालावधी लागणार होता. त्यातच मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रेतीबंदर पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. या कामाला सुमारे पाच ते सहा महिने जाणार होते.
साकेत पुलाला आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गास पर्यायी मार्ग नसल्याने तसेच शहरात वाहतूक कोंडीच्या भीतीने वाहतूक पोलिसांनी त्यास परवानगी दिली नव्हती. पावसाळय़ात गेल्या वर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वीच एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक नियंत्रण विभागाबरोबर बैठक घेतली. तसेच साकेत आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गाची पाहणी केली. साकेत पुलावर सध्यातरी मोठय़ा दुरुस्तीची गरज नसल्याचे अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे आता साकेत पुलावर केवळ रस्त्यामधील लोखंडी सळई बसविणे तसेच डांबरीकरण केले जाणार आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील दुरुस्ती पावसाळय़ात सुरू केल्यास त्याचा फटका वाहनचालकांना बसणार होता. त्यामुळे हीदेखील दुरुस्ती पुढे ढकलण्यात आली आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरही खड्डय़ांच्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली जाणार आहे.
वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून साकेत आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर सध्यातरी तात्पुरती दुरुस्ती केली जाणार आहे. – बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा