करोना निर्बंध हटताच बार, रेस्टॉरंटमध्ये मद्यपींची गर्दी; राज्य सरकारच्या तिजोरीत भर

किशोर कोकणे

ठाणे : करोनाचा घटता प्रादुर्भाव, राज्य सरकारने शिथिल केलेले निर्बंध यांचा परिणाम अन्य क्षेत्रांप्रमाणेच मद्यउद्योगावरही दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील बार आणि रेस्टॉरंटना रात्री १२ पर्यंत परवानगी दिल्यानंतर अवघ्या महिनाभरात ५५ लाखांहून अधिक लिटरचे मद्य ठाणेकरांनी रिचवल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीतून दिसून येते. याद्वारे उत्पादन शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीतही घसघशीत भर पडू लागली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यभरातील बारमध्ये मद्यसेवनास मज्जाव करण्यात आला होता. केवळ वाइनशॉपमधून मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे बार व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने बार आणि रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी दिल्याने येथे गर्दी होऊ लागली आहे.

निर्बंध शिथिलीकरणानंतर ठाणे जिल्ह्यात भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि बीयर या दोन मद्याच्या प्रकारांच्या विक्रीमध्ये मोठी उसळी झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर महिन्यात भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि बीयरची ५५ लाख ४४ हजार ५१८ लिटर विक्री झाल्याची नोंद उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली आहे.

यातील वाढीव टक्का हा बारमधील आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ऑक्टोबर २०२० मध्ये ४७ लाख ७३ हजार ४६४ इतके विक्रीचे प्रमाण होते. यावर्षी करोना निर्बंध शिथिल झाल्याने विक्रीचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.