ठाणे : पावसाच्या सरींनी हजेरी लावताच नागरिकांकडून बाजारपेठांमध्येही रंगीबेरंगी छत्री खरेदी करण्यास सुरूवात झाली आहे. २५० रुपयांपासून ते एक हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या छत्री ठाण्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा डबल डेकर या छत्रीचे आकर्षण ग्राहकांमध्ये अधिक आहे. ही छत्री दोन कापडांनी बनविली आहे. यासोबतच विविध नक्षीकामाच्या, लहान मुलांसाठी कार्टुनचे छायाचित्र असलेल्या छत्री ही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येते. तर एकल वापराचा रेनकोट देखील ३० रुपयांपासून उपलब्ध आहे.
पावसाळा सुरू होताच नागरिकांची बाजारपेठेत छत्री खरेदीसाठी गर्दी होते. यंदाही हेच चित्र बाजारपेठेत दिसून येते. राज्यातील विविध भागांमध्ये मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली असून यंदा जून ऐवजी मे महिन्यापासूनच छत्री आणि रेनकोट खरेदीला सुरवात झाली आहे. यंदा शहरातील बाजारपेठेत रंगीबेरंगी अशा आकर्षक आणि विविध नक्षीकाम केलेल्या छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
यामध्ये इंद्रधनुष्य (रेन-बो) छत्री, थ्रीडी आणि रंग बदलणारी छत्री, लहान मुलांसाठी कार्टूनचे छायाचित्र असलेली अशा विविध प्रकारच्या छत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये डबल डेकर छत्री विक्रीसाठी उपलब्ध आहे. या छत्रीचे आकर्षण ग्राहकांमध्ये असून या छत्रीला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
दोन थरांच्या कापडाने तयार केलेली ही छत्री अधिक मजबूत आहे. ही छत्री केवळ टिकाऊच नाही, तर दिसायलाही आकर्षक आहे. तिची किंमत सुमारे ११०० रुपये आहे. छत्रीच्या दरात वाढ झालेली नसून गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही छत्रीचे दर आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. रेनकोट खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. तसेच ‘एकल वापर’ करता येईल अशा प्रकारचे रेनकोट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून वजनाने हलका असलेल्या या रेनकोटची किंमत ३० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत आहे.
रंग बदलणारी छत्री
पाण्याचा किंवा सूर्यप्रकाशाचा संपर्क आला की छत्री रंग बदलते. रंग बदल्यानंतर त्या छत्रीवर विविध चित्र दिसू लागतात. ही छत्री दिसायला साध्या रंगाची असते. पण पावसात भिजली की छत्रीवर फुले, कार्टून, रंगीत पट्ट्या दिसू लागतात.
डबल डेकर छत्री
डबल डेकर छत्री ही कापडाच्या दोन थरांनी तयार करण्यात आली आहे. या छत्रीत दोन कपड वापरण्यात येतात. दोन छत्र्या एकमेकांवर ठेवलेल्या असाव्यात अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. या छत्री मजबूत असल्यामुळे हवेच्या वेगाने उलटी होऊन तुटत नाही, असा विक्रिते करत आहेत.
लहान मुलांसाठी आकर्षण
लहान मुलांसाठी विविध कार्टुनचे छायाचित्र असलेल्या छत्र्या तसेच रेनकोट बाजारात दाखल झाले आहेत. यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू, स्पायडरमॅन तर लहान मुलींसाठी डोरा, बार्बी डॉल, सिंड्रेला यांचे छायाचित्र असलेल्या छत्र्या तसेच रेनकोटचा समावेश आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात छत्र्यांची विक्री सुरू होते. यंदा पाऊस लवकर आल्याने विक्री १५ मेपासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत १५ ते २० टक्के छत्र्यांची विक्री झाली आहे. – जय सुराणा, विक्रेते